आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान आत्मसात करण्यास व्हावा ः भास्करगिरी महाराज देवगड येथे शिर्डी हॅम रेडिओ सेंटरचा शुभारंभ; नैसर्गिक आपत्तीवेळी होणार उपयोग

नायक वृत्तसेवा, नेवासा
शिर्डी हॅम रेडिओ सेंटरचा नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे भास्करगिरी महाराजांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भास्करगिरी महाराज यांनी शुभाशीर्वाद देऊन हॅम रेडिओ एक तांत्रिक छंद आणि सामाजिक सेवा असून ज्याद्बारे संदेश आणि दळणवळण संपर्काच्या अ-व्यवसायिक बिनतारी दळणवळण संपर्क यंत्रणा आणि यंत्रणेविषयी प्रशिक्षण स्वयं-प्रशिक्षण या सेवा मिळू शकतात अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न व्हावा, असे प्रतिपादन केले.

पुणे येथील रेडिओ क्लबचे मार्गदर्शक विलास रबडे म्हणाले, जागतिक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनामध्ये हॅम रेडिओचा प्रामुख्याने उपयोग होतो. नैसर्गिक आपत्ती जसे भूकंप, पूरपरिस्थीती अशा संकटाच्यावेळी सर्वसाधारण दळणवळण संपर्क यंत्रणा कोलमडून पडते तेव्हा हॅम रेडिओ ही एकमेव संपर्क यंत्रणा आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये ती महत्त्वपूर्ण कार्य करते, ज्यामुळे प्रशासनाशी संपर्क साधून वेळीच मदत मिळवता येते आणि होणारे नुकसान कमी करण्यास अथवा टाळण्यास मदत होते.

शिर्डी अमेच्योअर रेडीओ क्लबची आपत्कालीन संपर्क यंत्रणा आता नेवासा शहरामध्ये डॉ.करणसिंह घुले यांच्याकडे सुरु झाली आहे. श्री क्षेत्र देवगड येथे या यंत्रणेची आपत्कालीन व्यवस्थेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शिर्डी अमेच्योअर रेडिओ क्लबचे परशुराम कुटे आणि मंगेश पाटील यांनी पंचवीस ते तीस मिनिटांमध्ये बिनतारी दळणवळण यंत्रणेची उभारणी केली. याप्रसंगी समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले, पंचायत समितीचे माजी सदस्य जानकीराम डौले, पत्रकार सुधीर चव्हाण, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब अरगडे, देवगडचे सरपंच अजय साबळे, पुणे हॅम रेडिओ क्लबचे विलास रबडे, मंगेश पाटील, श्रीपाद कुलकर्णी, नंदकुमार फौजदार, देवगड संस्थानचे कार्यालयीन अधिकारी महेंद्र फलटणे, चांगदेव साबळे, रामेश्वर तनपुरे, तात्या शिंदे उपस्थित होते.

