घारगाव येथे कंटेनरच्या धडकेत चिमुकली ठार; चार जखमी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे रविवारी (ता.10) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालवाहू कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दहा महिन्यांची चिमुकली ठार झाली असून, चार जण जखमी झाले आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काटवणवाडी (डोळासणे) येथील नामदेव अंकुश पारधी व त्यांची पत्नी मंगल नामदेव पारधी हे रविवारी दुपारी आपली दहा महिन्यांची चिमुकली प्रतीक्षा हिला आजारी असल्याने दुचाकीवरुन (क्रमांक एमएच.17,बीके.8809) घेऊन घारगाव येथील दवाखान्यात चालले होते. औषधोपचार घेतल्यानंतर परतीला असताना घारगाव बसस्थानकाजवळ आले असता पाठीमागून येणार्‍या मालवाहू कंटेनर (क्रमांक टीएन.02, बीएल. 6729) याने दुचाकीस जोराची धडक दिली. यामुळे आई मंगल यांच्या हातातून चिमुकली चिमुकली प्रतीक्षा सटकून महामार्गावर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.

तर आई मंगल व वडील नामदेव पारधी हे जखमी झाले आहेत. त्याच दरम्यान काही अंतरावर उभे असलेले नवनाथ सखाराम गाढवे व शिवाजी रामचंद्र भागवत या दोघांनाही कंटेनरने जोराची धडक बसल्याने नवनाथ गाढवे हे गंभीर जखमी झाले तर शिवाजी भागवत हे किरकोळ जखमी झाले. या सर्वांना औषधोपचारासाठी संगमनेर येथे नेण्यात आले. या अपघाताची समजताच पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी कंटेनरचा पाठलाग करत कंटेनर चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चिमुकली प्रतीक्षा हिच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 211 Today: 1 Total: 1952501

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *