झुंडशाही विरोधात खुनाच्या प्रयत्नासह हत्यार कायद्यान्वये गुन्हा! संगमनेरातील मंगळवारची घटना; शहरातील जातीय तणावात वाढ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विनाक्रमांकाच्या चारचाकी वाहनाने कट मारल्यानंतर केवळ चालकाकडे पाहिले म्हणून पाच ते आठ जणांनी दुचाकीवरील तरुणासह त्याच्या मदतीसाठी धावलेल्या चौघांवर प्राणघातक हल्ला केला. यावेळी पुन्हा एकदा कायद्याचे राज्य नाकारुन एका विशिष्ट समुदायातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी झुंडशाही करीत अतिशय किरकोळ कारणावरुन चक्क तलवारी, लोखंडी रॉड आणि कुर्हाडीसारख्या घातक शस्त्रांचाही वापर केला. मात्र दैवबलवत्तर म्हणून काही स्थानिक नागरिक मदतीला धावल्याने आणि ऐनवेळी तलवारीचा वार चुकवला गेल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर शहरातील काहीभागात त्याचे पडसादही उमटल्याने पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. या प्रकरणी जखमी झालेल्या राहुल गुंजाळ याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून कोल्हेवाडी रस्त्यावरील आठ जणांविरोधात सशस्त्र प्राणघातक हल्ला करुन पाचजणांचा खून करण्याचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ व धमकी आणि बेकायदा जमाव गोळा करुन दंगल घडवल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयीत आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. संगमनेर शहरात गेल्या चार वर्षात घडलेला हा सलग तिसरा प्रकार असून पोलिसांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि शहरातील वातावरण खराब करु पाहणार्यांना धडा शिकवण्याची गरजही निर्माण झाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.12) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या काठावर घडली. या प्रकरणी राहुल सोपान गुंजाळ (वय 38, रा.कोल्हेवाडी रोड) या तरुणाने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार फिर्यादी आपल्या दोन लहान मुलींसह दुचाकीवरुन संगमनेर शहराकडे येत असताना त्याची दुचाकी नाटकीनाला परिसरात आली असता पाठीमागून आलेल्या विनाक्रमांकाच्या पिकअप जीपने त्याला कट मारला व तो तसाच सुसाट वेगाने पुढे निघून गेला. मात्र या रस्त्यावर काही अंतरावरच असलेल्या गतीरोधकामूळे सदरचा पिकअप वाहनाचा वेग झाला असता राहुल गुंजाळ याने सदरील वाहन ओलांडताना वाहनचालकाकडे पाहिले.
त्याचा राग येवून संबंधित वाहनचालकाने ‘माझ्याकडे रागाने काय बघतो?’ असे म्हणतं उलट ‘त्या’ तरुणालाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गेल्याकाही वर्षात पोलीस आणि स्थानिक राजकारण्यांच्या गळचेपी भूमिकेमूळे शहरातील एका समुदायातील काहींची गुंडगिरी वाढली आहे. त्यातूनच तीन वर्षांपूर्वी रमजानच्या महिन्यातच चक्क पोलीस कर्मचार्यांना पळवून पळवून मारण्याची घटना घडली होती, त्यानंतर दीड वर्षातच पुन्हा एकदा जोर्वेनाक्यावर तसाच प्रकार घडून त्यातून संगमनेर शहरासह तालुक्यातील वातावरणही खराब झाले होते. या घटनेनंतरच संगमनेरातून पहिल्यांदाच अभूतपूर्व हिंदू जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र या सर्वांचा त्या गुंडांच्या मनोवृत्तीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.
‘एकतर चोर अन् वरती शिरजोर’ या म्हणीप्रमाणे दुचाकीवर दोन लहान मुलींसह जाणार्या तरुणाला जाणीवपूर्वक चारचाकी वाहनाने कटही मारला आणि केवळ त्याच्याकडे पाहिले म्हणनू त्याने त्या तरुणालाच शिवीगाळ करीत थेट त्या तरुणाच्या दुचाकीला आपले वाहन आडवे घालून दमदाटी आणि मारहाणही सुरु केली. या दरम्यान पिकअप चालकाने मोबाईलवरुन फोन करीत अन्यकाही गुंडांनाही घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी लागलीच या झुंडशाहीत आपला सहभाग नोंदवित काय झालयं हे समजून न घेताच थेट तलवारी, लोखंडी रॉड आणि कुर्हाडीसारखी जीवघेणी शस्त्रे घेवून आपल्या चिमुकल्या मुलींसह वाढदिवसाच्या कार्यक्रमाला चाललेल्या राहुल गुंजाळ या तरुणाचा जीव घेण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली.
या दरम्यान राहुल गुंजाळ याच्या वस्तीवरील काही माणसांनी रस्त्याने जाताना हा प्रकार पाहिल्यानंतर अमोल गुंजाळ, संदीप गुंजाळ, संकेत कोरडे व रवी गुंजाळ हे चौघे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच वाहनचालकाने आपल्या हातातील तलवारीने अमोल गुंजाळ याच्यावर वार केला, मात्र प्रसंगावधान राखून त्याने तो चुकवून तेथून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. हा सगळा गोंधळ पाहुन आसपासचे नागरिकही जमा होवू लागल्याने झुंडशाही करुन संगमनेरातील वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न करणार्या आठजणांनी पिकअप वाहनासह तेथून पळ काढला.
कायद्याचे अस्तित्वच नाकारुन अतिशय संतापजनक पद्धतीने घडलेल्या या घटनेची माहिती वार्याच्या वेगाने शहरात पसरली. त्यामुळे दुसर्या बाजूचा मोठा जमाव शहर पोलीस ठाण्यात जमा होवू लागला. त्यामुळे शहरातील तणावात भरही पडू लागली. मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात मासिक बैठक असल्याने उपविभागीय पोलीस अधिकार्यांसह पोलीस निरीक्षकही मुख्यालयात गेले होते. त्यामुळे इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलिसांकडून तत्काळ कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. त्यातून दुसर्या गटाचा गैरसमज होवून जमावाचा संताप वाढत गेल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. यानंतर तासाभरात आलेल्या अधिकार्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणताना दोषी असलेल्यांना कोणत्याही स्थितीत सोडणार नसल्याचे आश्वासन देत पोलीस ठाण्यात जमलेला जमाव पांगवला.
या जमावातील तरुण रात्री दहाच्या सुमारास आपापल्या दुचाकी वाहनांवरुन घराकडे जात असताना मोमीनपूरा व कोल्हेवाडी रस्ता या भागात दबा धरुन बसलेल्या काही गुंडांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी मुख्यालयातून संगमनेरकडे येतानाच विभागीय बंदोबस्त (तालुका, आश्वी, घारगाव, अकोले, राजूर) मागावून घेत शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे घराकडे जाणार्यांवर हल्ला होत असल्याचे समोर येताच पोलिसांनी तत्काळ ‘त्या’ भागात बंदोबस्त तैनात करुन तेथे जमलेल्या गुंडांना पिटाळून लावले. त्यामुळे रात्री शहरात निर्माण झालेला तणाव कमी होण्यास मदत मिळाली.
याप्रकरणी राहुल गुंजाळ याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पिकअप वाहनाचा चालक अल्फाज शेख याच्यासह अरबाज कुरेशी, समद कुरेशी व अन्य अज्ञात पाच इसमांविरोधात प्राणघातक शस्त्राने खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कलम 307, अनाधिकाराने थांबवणे, मारहाण व शिवीगाळ करुन धमकावण्याच्या कलम 341, 324, 323, 504, 506 सह बेकायदा जमाव गोळा करुन दंगल घडवण्याच्या कलम 143, 147, 148, 149 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी मध्यरात्रीनंतर छापासत्रही राबवले, मात्र अटकेच्या भीतीने सर्व संशयीत पसार झाले आहेत. या घटनेनं रमजानच्या पहिल्याच दिवशी संगमनेरातील वातावरण खराब झाले असून त्याचे पडसाद समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या संगमनेरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अतिरीक्त कुमक मागवत शहरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
क्षणचित्रे..
* एका विशिष्ट समुदायातील गुडांकडून गेल्या चार वर्षात घडलेल्या तिसर्या प्रकाराने संगमनेरात संताप.
* राहुल गुंजाळ या तरुणाला त्याच्या अवघ्या तीन व चार वर्षांच्या लहान मुलींसमोरच जमावाकडून अमानुष मारहाण.
* जमावाकडून तलवारी, लोखंडी रॉड व कुर्हाडींचाही मुक्त वापर.
* ड्युटीवरील महिला पोलिसांना घटनेचे गांभीर्यच समजले नाही, त्यामुळे सुरुवातीला केवळ ‘अदखलपात्र’ गुन्हा नोंदवून फिर्यादीची बोळवण करण्याचा प्रयत्न.
* संतप्त जमाव गोळा झालेला असतानाही दुसर्या गटातील प्रमुखांकडून सामंजस्याची भूमिका, त्यामुळे अनर्थ टळला.
* पोलीस ठाण्यातून माघारी जाणार्या काही तरुणांना रस्त्यात मारहाण करुन शहर पेटवण्याचाही काहींचा प्रयत्न.
* पोलीस उपअधीक्षकांच्या चपळाईने शहर पेटवण्याचा प्रयत्न उधळला.
* दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची पोलिसांची ठाम भूमिका.
* दुसर्या गटाकडूनही हल्ले होत असल्याचे खोटे चित्र निर्माण करण्याचाही प्रयत्न.
* कोल्हेवाडीतील मराठा समाज एकवटवला.
* जोर्वेनाक्याप्रमाणे कोल्हेवाडी रस्त्यावरील अतिक्रमणं हटवण्याचीही मागणी.
या घटनेची पोलिसांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतली असून तरुणाला मारहाण करणार्या आठजणांची ओळख पटवण्यात आली आहे. जखमी तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून दोषी असलेल्या इसमांना कोणत्याही स्थितीत जेरबंद केले जाईल. शहरात मुबलक पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला गस्तही वाढवण्यात आली आहे. सध्या संगमनेरात शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण अफवा पसरवून वातावरण खराब करणार्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
सोमनाथ वाघचौरे
पोलीस उपअधीक्षक, संगमनेर