नगर-मनमाड रस्त्याच्या कामाचा ठेकेदार पळून गेला का? वैतागलेल्या प्रवाशाने देहेरे टोलनाक्यावरच लावला फलक


नायक वृत्तसेवा, नगर
नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडल्याने तो अत्यंत खराब झाला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. कंत्राटदार काम सोडून गेल्याचे कारण सांगून लोकप्रतिनिधी हात झटकत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या एका प्रवाशाने टोलनाक्यावरच फलक लावून थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाच सवाल केला आहे. ‘या रस्त्याच्या कामाचा ठेकेदार पळून गेला की पळून लावला?’ असा सवाल फलकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या फलकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नगर-मनमाड महामार्गावर नगर जवळच्या देहेरे येथील टोलनाक्यावर हा फलक लावण्यात आला आहे. त्यात थेट केंद्रीय मंत्री गडकरी यांनाच सवाल करण्यात आला आहे. ‘अहो गडकरी साहेब, आपण भाषणामध्ये सांगता भारतामधील रस्ते अमेरिकेसारखे गुळगुळीत करणार… नगर मनमाड रस्त्याच्या ठेकेदार पळून गेला की पळवून लावला?’, असा मजकूर त्यावर लिहिला आहे. खड्डेमय रस्त्याच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर हा मजकूर लिहिण्यात आला आहे. हा फलक जाणार्‍या-येणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यावर गडकरी यांचे छायाचित्रही लावण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकारकडे असलेला हा रस्ता केंद्र सरकारच्या यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला. त्या यंत्रणेमार्फत याचे काम सुरू आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हे काम प्रतिष्ठेचे केले आहे. तर आपल्या मतदारसंघातून जाणारा रस्ता म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही यात लक्ष घातले होते. मात्र, पुढे श्रेयवाद, राजकारण आणि अडचणी वाढत गेल्या. त्यामुळे हे काम घेणार्‍या बाहेरच्या कंपनीने सोडून दिले. कंत्राटदार कंपनी आपले ऐकत नसल्याची तसेच काही मंडळी कामात अडथळे आणत असल्याची तक्रार खासदार विखे यांनी अनेकदा जाहीरपणे केली होती. कंत्राटदार बदलण्यासाठी त्यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावाही केला. सध्या या रस्त्याचे काम अर्धवट झालेले आहे. त्याच दरम्यान कंत्राटदाराने काम सोडले. आता हे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होण्यास मोठा विलंब लागणार आहे. तोपर्यंत तेथे डागडुजीही करता येणे शक्य नाही. अशा परिस्थितीत या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. कित्येक बळीही गेले आहेत. त्यामुळेच आता प्रवाशांच्या संयमाचा अंत झाल्याचे या फलकावरून दिसून येते.

Visits: 94 Today: 2 Total: 1100538

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *