‘शांती’ घाटाच्या मार्गात पशूपक्ष्यांच्या शरीराचे कापलेले अवशेष! अमरधामचा परिसर दुर्गधीयुक्त झाल्यानंतर आता ‘शांती’ घाटावरही ‘अशांती’चे प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे रस्त्यावरील प्रवरानदी काठावर असलेल्या हिंदु धर्मीय अमरधामच्या परिसरात संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्यांमधील कापलेल्या जनावरांचे अनावश्यक भाग फेकले जातात. त्यामुळे अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी गेलेल्या संगमनेरकरांना नाकमुरडीतच येथे वावरावे लागत असतांना, आता प्रवरा-म्हाळुंगी नद्यांच्या संगमावर लाखों रुपये खर्च करुन बांधलेल्या ‘शांती’ घाटालाही ‘अशांत’ करण्यासाठी काही असामाजिक तत्त्व पुढे सरसावल्याचे दृष्य दिसू लागले आहे. त्यासाठी चंद्रशेखर चौकाकडून या घाटाकडे जाणार्या रस्त्यावर ठिकठिकाणी कापलेल्या पशूपक्ष्यांचे टाकाऊ भाग फेकले जात असल्याने दहाव्याच्या विधीसाठी जाणार्यांना हा मार्गही आता नकोसा वाटू लागला आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने वेळीच या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जवळपास लाखाच्या आसपास लोकसंख्येच्या संगमनेर शहरातील हिंदु धर्मीयांसाठी पुणे रस्त्यावरील पुलानजीक चार दशकांपूर्वी ‘अमरधाम’ बांधण्यात आले. त्यापूर्वी त्याच ठिकाणी उघड्यावर मृतकांवर अंत्यसंस्कार केले जात असत. मात्र गेल्या चाळीस वर्षात संगमनेर शहराची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढूनही संगमनेरकरांसाठी अमरधामला दुसरा पर्याय निर्माण केला गेला नाही. त्यामुळे अनेकदा अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक राहत नाही, त्यामुळे नागरिकांना नदीकाठावर उघड्यावरच आपल्या प्रियजनांचे अंत्यसंस्कार करावे लागल्याचे प्रसंगही वारंवार समोर आले आहेत. मध्यंतरीच्या काळात पंधरा वर्षात दुसर्यांदा येथील अमरधामचे सुशोभिकरण करण्यात आले, पण त्यातून ‘संस्कार वेदीं’ची संख्या मात्र आहे तितकीच असल्याने संगमनेरकरांना त्याचा कितपत लाभ होईल हे येणार्या काळात समोर येईलच.
त्यातच मागील काही वर्षांपासून शहरात बेकायदा चालणार्या गोवंश जनावरांच्या काही कत्तलखान्यांमधील कापलेल्या जनावरांच्या शरीराचे अनावश्यक भाग याच अमरधामच्या परिसरात नदीकाठी फेकले जात आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच प्रचंड दुर्गधीने भरलेला असतो. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणार्या संगमनेरकरांना तासभर चालणार्या अंत्यविधी दरम्यान अक्षरशः नाक दाबूनच या परिसरात वावरावे लागते. याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला, पालिकेकडे तक्रारीही केल्या. पण मतांच्या राजकारणात गुरफटलेल्या पालिकेने आपला एक डोळा बंदच करुन ठेवल्याने त्यांना फक्त एकाच भागाच्या समस्या दिसत असल्याचे वास्तवही त्यातून समोर आल्याने आता बोलणारी तोंडेही फेसाळून बंद झाली आहेत.
कोणत्याही धर्मात अंत्यसंस्कारांना अत्यंत महत्त्व असते. अमरधाम अथवा कब्रस्थानासारख्या ठिकाणांना म्हणूनच अत्यंत पवित्र मानले गेले आहे. मृतकावर त्याच्या धर्मसंहितेनुसार संस्कार झाल्यास त्याच्या आत्म्याला शांती प्राप्त होते असेही प्रत्येक धर्मात सांगीतले गेले आहे. हिंदु धर्मीयांमध्ये दाहसंस्कार झाल्यानंतर दुसर्या दिवशी सावडण्याचा विधी केला जातो. त्यासाठी जेथे मृतकाला अग्निडाग दिला गेला असेल तेथे सावडल्यानंतर पूजा-अर्चना करुन पितृरुपी कावळ्यांसाठी अन्न शिजविले जाते व त्याचे पींड तयार करुन ते तेथेच ठेवले जातात. कावळ्याने त्याला स्पर्श करुन घास घेतल्यास मृतात्म्याला शांती प्राप्त झाली असे समजण्याचा धार्मिक प्रघात आहे. मात्र मागील काही वर्षात अमरधामच्या परिसरातच कत्तलखान्यातील कापलेल्या जनावरांचे अनावश्यक भाग टाकले जात असल्याने या परिसरातील कावळे त्यावरच ताव मारीत असल्याने मृतकाच्या परिवारजनांना पिंडांला कावळा शिवेल याची वाट बघत तासन्तास तिष्ठत बसावे लागते.
आता असाच काहीसा प्रकार संगमनेर नगरपालिकेने जनतेच्या करातून लाखों रुपये खर्च करुन उभारलेल्या शांती घाटाच्या बाबतीतही घडू लागला आहे. प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर अच्च्युतनगरच्या तोंडावरच ‘शांती’ घाट बांधला गेला आहे. संगमनेर शहरातून या घाटाकडे जाण्यासाठी चंद्रशेखर चौकातील बालमघाटापासूनच जावे लागते. मात्र आता या रस्त्यावर जागोजागी शहर व परिसरातील काही चिकन विक्रेते कापलेल्या कोंबड्यांचे अनावश्यक भाग प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरुन, रात्रीच्या अंधारात गुपचूप या रस्त्याच्या कडेला आणून टाकीत आहेत. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटण्यासह कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून संगमनेर खुर्दला जोडणार्या या रस्त्यावर अपघातांची संख्याही वाढली आहे. या प्रकारामुळे आधीच हिंदु स्मशानाच्या परिसरात शाकाहारी कावळ्यांची वाणवा असतांना आता त्यात त्यांना चिकनचाही पर्याय मिळाल्याने मृतकाच्या नातेवाईकांच्या समस्या वाढल्या आहेत.
गोवंश कत्तलखान्यातील अनावश्यक अवयवांमुळे आधीच अमरधामचा परिसर प्रचंड दुर्गंधीयुक्त आणि पितृरुपी कावळ्यांची टंचाई निर्माण करणारा झालेला असतांना आता मृतकाच्या दहाव्या दिवसाच्या विधीसाठी वापरल्या जाणार्या शांती घाटाच्या बाबतीतही तसेच प्रकार सुरु झाल्याने बालमघाटापासून ते शांतीघाटापर्यंतचा परिसरही आता हळुहळु दुर्गंधीत बुडत असल्याने अनेकजण या भागातून जातांना नाक मुरडीत आहेत. काही असामाजिक तत्त्वांकडून जाणीवपूर्वक सुरु असलेला हा प्रकार न थांबल्यास एकतर लाखों रुपये खर्च करुन बांधलेला शांतीघाट वापराशिवाय राहण्याचा अथवा सामाजिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाने या गोष्टींचा अतिशय गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे, अन्यथा काळ सोकावण्याचीच अधिक भिती निर्माण झाली आहे.
आयुष्यभर संघर्षमय जीवन असले तरीही प्रत्येकाला अंतिम संस्कार पारंपरिक पद्धतीने मिळावेत असे अपेक्षित असते. संगमनेरात मात्र या अपेक्षेलाच सुरुंग लावला जात आहे. लाखभर लोकसंख्येच्या संगमनेरात हिंदु समाज बहुसंख्य असतांनाही या समाजासाठी केवळ एकच स्मशान उपलब्ध आहे. या समाजाकडून वारंवार दुसर्या पर्यायी वैकुंठधामची मागणीही केली गेली आहे, मात्र आजवर पालिकेतील सत्ताधार्यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षदाच लावल्या आहेत. आता त्याच नागरिकांच्या कररुपी लाखों रुपयातून मृतकाला सद्गती प्राप्त होण्यासाठी पालिकेने ‘शांती’ घाटाची निर्मिती केली आहे, मात्र त्यालाही काही असमाजिक तत्त्वांची दुष्कृत्य आडवी येवू लागल्याने ‘शांती’च्या नावावर उभ्या राहीलेल्या या घाटावर ‘अशांती’चे ढग गोळा झाले आहेत. पालिका व पोलिसांनी प्रसंग घडण्याची प्रतिक्षा करण्यापेक्षा वेळीच याकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.