वीरभद्र मंदिरासमोरील भाग ‘नो पार्किंग झोन’ करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
शहरात बेशिस्त व बेकायदेशीरपणे रिक्षा चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चालकांवर कारवाई करून, नगर -मनमाड महामार्गावरील वीरभद्र मंदिरासमोरचा भाग रिक्षांसाठी ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित करावा अशी मागणी राहाता पालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ व विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनावर नगरसेविका अनुराधा तुपे, नगरसेवक भीमराज निकाळे, माजी नगराध्यक्ष डॉ.के.वाय.गाडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शशीकांत लोळगे, वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष सागर सदाफळ, नगरसेवक हरी पवार, माजी नगराध्यक्ष सोपान सदाफळ, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, नाभिक समाजाचे कार्यकर्ते दशरथ तुपे, किरण वाबळे, रामनाथ सदाफळ, सदानंद ताम्हणे, ज्ञानेश्वर महाले, गणेश मुर्तडक यांच्यासह आदिंच्या सह्यां आहेत. राहाता ते शिर्डी दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रिक्षा वाहतूक सुरु आहे. या रिक्षांवरील चालक नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण करत असून अनेक चालक हे गुंड प्रवृत्तीचे व गुन्हेगारी मानसिकतेचे आहेत. अपवाद वगळता अनेक रिक्षा चालक हे व्यसनाधीन अवस्थेत प्रवाशांसह रिक्षा चालवत असतात. प्रवाशांना रिक्षात बसण्यासाठी बळजबरी करणे, मनमानीप्रमाणे भाडे आकारणे, साईभक्तांची जादा भाडे घेवून आर्थिक लुट करणे असे प्रकार वारंवार करत आहेत. त्यामुळे या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Visits: 344 Today: 11 Total: 1579761

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *