बेपत्ता मुलगी व नातवाच्या शोधासाठी आईचे नेवासा ठाण्यासमोर उपोषण आश्वासनानंतर उपोषण स्थगित; मात्र तपास न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पाचेगाव येथील विवाहित बेपत्ता मुलगी व नातवाचा पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. याबाबत पोलिसांनी लवकरात लवकर तपास लावावा या मागणीसाठी मुलीच्या आईने नेवासा पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी (ता.1) उपोषण सुरू केले होते. या महिलेला साथ म्हणून भारिप बहुजन संघ व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष हरीश चक्रनारायण यांनी या उपोषणाचे नेतृत्व केले. शेवटी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करुन लवकर तपास न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत बेपत्ता विवाहित मुलीची आई केशरबाई पवार यांनी नेवासा पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गेल्या तीन महिन्यांपासून माझी मुलगी सिंधूबाई भागवत बोरसे व नातू कानिफनाथ हे दोघे मायलेक पाचेगाव येथून बेपत्ता झाले असून त्यांचे अपहरण झाले की त्यांना कोणी पळवून तर नेले नाही ना असा संशय मला वाटतो. मी तीन महिन्यांपूर्वी नेवासा पोलीस ठाण्याला मुलगी व नातू बेपत्ता झाले असल्याची खबर दिली होती. याबाबत गुन्हाही दाखल आहे. मात्र पोलिसांनी कुठलाच खुलासा केला नसल्याचे तसेच काहीच निष्पन्न झाले नसल्याचे उपोषणकर्त्या केशरबाई पवार यांचे म्हणणे होते.

माझ्या मुलीस तीन मुले असून त्यापैकी मधला मुलगा कानिफनाथ हा मुलगी सिंधूबाई सोबत असून 17 वर्षांचा शनैश्वर व दहा वर्षांची मुक्ता ही माझ्याजवळ साईनाथनगर येथे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तरी माझ्या बेपत्ता मुलीचा व नातवाचा तपास पोलिसांनी लावावा. अन्यथा होणार्‍या परिणामाची सर्व जबाबदारी शासनावर राहील असा स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. वरील मुख्य मागणीसाठी उपोषणास बसलेल्यांमध्ये वडील बहिरनाथ पवार, नातू शनैश्वर व नात मुक्ता यांचा समावेश होता. या उपोषणाला पत्रकार रमेश राजगिरे यांनी पाठिंबा दिला. शेवटी आश्वासनंतर आम्ही उपोषण स्थगित करत असून बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास न लागल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हरीश चक्रनारायण यांनी दिला आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1121337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *