संगमनेर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींनी रोवला ‘बिनविरोध’चा झेंडा! उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी विक्रमी उमेदवारांनी घेतले अर्ज मागे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत रंग भरायला सुरुवात झाली आहे. सोमवारी (ता.4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 2 हजार 606 उमेदवारांपैकी तब्बल 932 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे 94 ग्रामपंचायतींच्या 192 जागा बिनविरोध झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यातील चार ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा रोवला असून आता उर्वरीत 287 प्रभागातील 696 जागांसाठी 1 हजार 482 उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकले आहेत. गावपातळीवरील राजकारणाचा केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडाव्यात असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे.
ग्रामपातळीवरील विधानसभा समजल्या जाणार्या ग्रामपंचायत निवडणूकांना अलिकडच्या काळात अनन्यमहत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होताच निवडणुका होत असलेल्या गावांमधील वातावरण राजकीय बनले होते. यंदा गावच्या राजकारणात पाय ठेवून आपली महत्त्वकांक्षा तडीस नेण्यासाठी गावागावातून तरुण उमेदवार पुढे आल्याने या निवडणुकीची रंगत वाढत जाणार असाच काहीसा अंदाज वर्तविला गेला होता. चार दिवसांच्या राजकारणातून गावातील सौहार्दाचे वातावरण बिघडू नये यासाठी अनेक गावातील ज्येष्ठांनी आणि नेत्यांनी बिनविरोधचाही नारा दिला होता. मात्र त्याला केवळ चार गावांनी प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या 328 प्रभागातील 888 सदस्यांसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी एकूण 2 हजार 679 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यातील 73 जणांचे अर्ज अवैध ठरल्याने प्रत्यक्षात 2 हजार 606 जणांचे अर्ज शिल्लक राहीले होते. अर्ज मागे घेण्याच्या चार दिवसांत तुरळक जणांनी माघार घेतल्याने सर्वच्या सर्व 94 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होतील अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र निवडणूकांतून गावचे वातावरण खराब होवू नये यासाठी काही ज्येष्ठांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण 328 प्रभागांपैकी 41 प्रभागातील 192 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.
त्यात आंबी खालसा येथील चार प्रभागातील अकरा जागांसाठी 17 जणांनी, निमगाव टेंभी येथील तीन प्रभागातील सात जागांसाठी 10 जणांनी, निमगाव बु. येथील चार प्रभागातील अकरा जागांसाठी 17 जणांनी तर भोजदरी येथील तीन प्रभागातील 9 जागांसाठी बारा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिकांनी एकत्र येवून जून्या-नव्यांचा ताळमेळ बसवित यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याला संपूर्ण गावानेच साथ दिल्याने या चारही गावातील एकूण 14 प्रभागांतील 38 जागांसाठी दाखल झालेल्या 56 उमेदवारी अर्जांपैकी 18 जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतल्याने या चारही गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. आता उर्वरीत 90 ग्रामपंचायतींमधील 287 प्रभागातील 696 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार असून त्यासाठी 1 हजार 482 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
तालुक्यातील मिरपूर येथील तीन प्रभागातील सात जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण 24 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील प्रभाग क्र. दोनमधील उमेदवार प्रियंका रणमाळे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांनी छाननीत बाद ठरविला होता. त्या निर्णयाविरोधात त्यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सोमवारी उच्च न्यायालयाने त्यांची याचिका निकाली काढतांना निवडणूक निर्णय अधिकार्यांचा निर्णय फिरवून त्यांची उमेदवारी कायम केली. तर अर्ज माघारीच्या दिवशी एकूण अकरा जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता येथील सात जागांसाठी तेराजण निवडणूक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या घटनाक्रमात हा प्रसंग सर्वाधिक लक्ष्यवेधी ठरला.