निळवंडे डाव्या कालव्याचे आवर्तन तातडीने बंद करा ः पांडे उग्र आंदोलन करून चाक बंद करण्याचा दिला इशारा

 

नायक वृत्तसेवा, अकोले
निळवंडे धरणाचे डाव्या व उजव्या बाजूच्या कालव्याचे काम अपूर्ण असताना आधी मुख्यमंत्री, पालकमंत्री नंतर पंतप्रधान पुन्हा पालकमंत्री यांनी असे तीनवेळा जलपूजन केले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला अकोले तालुक्यातील एकही भूमिपुत्र अथवा प्रकल्पग्रस्त शेतकरी आठवला नाही. कालव्याचे काम घाई घाई केल्यामुळे काम निकृष्ट झालेले आहे. बांधकामे सुद्धा घाई घाई उरकले आहे. काळी माती भरलेली नाही. म्हणून कालव्यास गळती लागलेली आहे. उंचीवरच्या भागातून जास्त गळती होत आहे, म्हणून हे आवर्तन बंद करावे अशी मागणी जलअभ्यासक मीनानाथ पांडे यांनी केली आहे.

सदर चाचणीचे आवर्तन असताना दीर्घकाळ आवर्तन चालल्यामुळे कळस खुर्द, कुंभेफळ, सुगाव खुर्द, रेडे, खाणापूर, टाकळी, ढोकरी, उंचखडक खुर्द, मेहेंदुरी, म्हाळादेवी, निंब्रळ या गावांमधील शेतकर्‍यांच्या शेतात पाणी पाझरल्यामुळे पिके नष्ट झालेली आहेत. शिवारातील रस्ते जलमय झाले आहे. खरेतर कामे पूर्ण करून व काँक्रिटीकरण करून पाणी सोडण्यास हवे होते. संगमनेर तालुका वगळता लाभक्षेत्रातील कोणत्याही तालुक्यात प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीत. कालव्यामध्ये बाधित शेतकर्‍यांना अत्यल्प मोबदला मिळाला आहे. त्यांच्या पाल्यांना लाभक्षेत्रातील संस्थांनी नोकर्‍या दिल्या पाहिजेत.

सदर आवर्तनाची कोणतीही पाणीपट्टी जलसंपदा खाते आकारीत नाही. खालच्या भागामध्ये पाण्याचे जलसंपदा विभागाचे कोणतेही नियोजन नाही. ज्याला वाटेल तो पाणी वळवत आहे. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी कोणाचेही दुमत नाही. मात्र अकोले तालुक्यातील जनतेला त्रास देऊन लोकांच्या भावनांशी खेळू नये. आमदार, खासदार, पालकमंत्री यांचेही याबाबतीत तालुक्यावर अन्याय करणारे धोरण आहे. या प्रश्नासंदर्भात बाधित शेतकर्‍यांची पक्षविरहित बैठक घेऊन उग्र आंदोलन करून चाक बंद करण्यात येईल असा इशाराही जलअभ्यासक मीनानाथ पांडे यांनी दिला आहे.

Visits: 123 Today: 2 Total: 1592634

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *