विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल! शहरातील लालतारा कामगार वसाहतीत रविवारी घडला होता हृदयद्रावक प्रसंग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रेम विवाह करुन सुखी संसाराची स्वप्नं पाहणार्या 21 वर्षीय तरुणीला सासरच्या जाचाला कंटाळून अखेर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली. गेल्या रविवारी तिने आपल्या माहेरी गळफास घेत या जगाचा निरोप घेतला. या प्रकरणी सुरुवातीला शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र तपासादरम्यान तिच्या आंतरजातीय विवाहाला विरोध करीत तीस हजारांची मागणी आणि त्यासाठी सतत शारीरिक व मानसिक छळाचे कारण समोर आल्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या पतीसह सासु-सासर्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शहरालगतच्या लालतारा कामगार वसाहतीत घडली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लालतारा कामगार वसाहतीमध्ये राहणार्या राहुल पांडूरंग घोडेकर याचे त्याच वसाहतीत राहणार्या वैष्णवी दिलीप श्रीराम या तरुणीशी सूत जुळले होते. दोघांनीही प्रेमाच्या आणाभाका घेत, एकमेकांसाठी जीव देण्याचा निश्चय करीत घरच्या विरोधाला न जुमानता गेल्यावर्षी प्रेमविवाह केला होता. मात्र हा विवाह तिच्या सासु-सासर्यांना मान्य नसल्याने सासरी आल्यापासूनच माहेरुन तीस हजार रुपये आणण्याच्या कारणावरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरु झाला. सदरचा विवाह आपण आपल्या इच्छेने केला असल्याने व आपल्या सासु-सासर्यांची मागणी पूर्ण करण्यास आपले आई-वडिल सक्षम नसल्याने त्या अवघ्या 21 वर्षांच्या मुलीने गेली दोन महिने हा सगळा त्रास सहन केला.
मात्र त्या उपरांतही तिच्यावर होणार्या अत्याचारात घट होण्याऐवजी त्यात वाढच झाल्याने तिने सासर सोडून माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतरही तिच्या मागे लागलेले अत्याचाराचे भूत काही मागे सरले नाही. सासर सोडून माहेरी आलेल्या या विवाहितेला तिचे सासु-सासरे फोन करुन विनाकारण वाद घालीत व तिला मानसिक त्रास देत. या सगळ्या प्रकाराला कंटाळून अखेर तिने अगदी टोकाचा निर्णय घेतला आणि गेल्या रविवारी (ता.3) तिने आपल्या माहेरी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.
या घटनेनंतर शहर पोलिसांनी सुरुवातीला स्टेशन डायरीत अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरु केला. मात्र नंतर तिच्या फोनसह अन्य काही वस्तुस्थितीजन्य पुराव्यांवरुन तिचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे समोर आल्याने सोमवारी (ता.4) तिचे वडील दिलीप रमेश श्रीराम यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी राहुल पांडूरंग घोडेकर (पती), पांडूरंग नामदेव घोडेकर (सासरे) व कांताबाई पांडूरंग घोडेकर (सासू) या तिघांविरोधात आत्महत्येक प्रवृत्त केल्याचे कलम 306 सह भा.द.वी.कलम 323, 504, 506, 507, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
प्रेमाच्या आणाभाका घेत, खोट्या भूलथापांना बळी पडून असंख्य मुली अशाच पद्धतीने मुलांवर विश्वास ठेवून आपल्या जन्मदात्यांना सोडून जातात व त्यांच्या मनाविरुद्ध विवाह करतात. त्यातील काहींचे संसार सुखाने फुलतात तर बहुतेकांच्या जीवनात जणू भूकंपच येत असतो. हा प्रकारही यापैकीच आहे. आपला प्रियकर राहुल यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून निष्पाप वैष्णवीने आपल्या जन्मदात्यांची चौकट त्यांच्या मनाविरुद्ध ओलांडली आणि काही महिन्यांतच पुन्हा त्याच चौकटीत येवून आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकाराने संपूर्ण लालतारा वसाहतीचा परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.