खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातून बेड्यांसह फरार झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी सचिन काळे याला गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव परिसरात सात महिन्यांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी संशयित आरोपी सचिन नेमाजी काळे (वय 39, रा.मुठेवाडगाव) याला येथील ग्रामीण रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात घेवून जाताना पोलिसांना चुकारा देत हरेगाव रस्त्यासमोर पोलीस वाहनाचा मागील दरवाजा उघडून बेड्यांसह तो फरार झाला होता. पोलीस शिपाई दत्तात्रय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, शहर पोलिसांकडून अनेक महिन्यांपासून त्याचा शोध सुरू आहे. परंतु, काळे पोलिसांना सापडत नसल्याने अखेर सहा महिन्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने काळेचा शोध घेतला. तेव्हा काळे हा वास्तव्य बदलून नारायणगाव (जि.पुणे) येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशीर देशमुख, फौजदार गणेश इंगळे, हवालदार भाऊसाहेब काळे यांनी सचिन काळेला अटक केली आहे.

Visits: 93 Today: 1 Total: 1113980

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *