संगमनेर शहर पोलिसांनी दिले पन्नास गोवंश वासरांना ‘जीवदान’! बेकायदा कत्तलखाने चालविणार्यांसह पुरावठादारांवरही कठोर कारवाईची गरज

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर पोलिसांनी सक्तिने बंद ठेवण्यास सांगीतलेल्या गोवंश कत्तलखान्यात चोरुन-लपून गोवंशाची कत्तल होत असल्याचे आज पहाटे समोर आले आहे. मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने वेळीच संबंधिताला रोखून ताब्यात घेतल्याने गोवंश जातीच्या पन्नास नवजात वासरांना जीवदान मिळाले आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले असून पोलिसांनी या कारवाईत सुमारे चार लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. या वृत्ताने शहराभोवतीच्या कत्तलखान्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सहाय्यक निरीक्षक रोहिदास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरात गस्त घालत होते. आज पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांचे गस्ती वाहन जोर्वेनाका परिसरात आले असता तेथून सुसाट वेगाने जाणार्या एका पांढर्या रंगाच्या पीकअप (क्र.एम.एच.14/जी.पी.5037) या वाहनावर त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी काही अंतर पाठलाग करीत त्या वाहनाला रोखून त्याची तपासणी केली असता पोलिसांचेही डोळे पांढरे झाले.

त्या छोट्याशा पीक-अप वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना त्या वाहनात दहा-विस नव्हे तर तब्बल पन्नास गोवंश जनावरांची नवजात वासरं अत्यंत निर्दयीपणाने एकमेकांचे गळे घट्ट बांधून त्या वाहनात कोंबल्याचे आढळले. वाहनचालकाला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अन्वर मोहंमद कुरेशी (वय 23, रा.पुनर्वसन वसाहत, सुकेवाडी रोड) असे सांगीतले. त्याला ताब्यात घेत पोलिसांनी सर्व पन्नास वासरांना सायखिंडीच्या जीवदया गोरक्षणात सोडून त्यांना जीवदान दिले.

या प्रकरणी पो.कॉ.सागर जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी अन्वर कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे वाहन आणि 50 हजार रुपये किंमतीचे एकूण पन्नास गोवंश वासरे असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कारवाईने शहरातील अवैध कत्तलखाना चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासूनच शहरातील बेकायदा कत्तलखाने बंद असल्याचे सांगीतले जाते. त्या पार्श्वभूमीवर आज पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईतून तब्बल पन्नास गोवंशाची नवजात वासरे सोडविण्यात आल्याने कत्तलीचा हा गोरखधंदा चोरुन-लपून सुरु असल्याच्या वृत्ताला एकप्रकारे बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी कत्तलखान्यांवरील कारवाईसोबतच कत्तलीसाठी लागणार्या गोवंश जनावरांचा पुरावठा करणार्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे.

