संप टाळून संगमनेर बस आगाराचे कर्मचारी कर्तव्यावर सर्व फेर्या सुरळीत सुरु; उत्तरेतील बहुतेक आगारांमध्ये मात्र शुकशुकाट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणेच वेतन आणि अन्य भत्ते मिळण्यासह विविध प्रलंबित मागण्या समोर करुन राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी आजपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतून कोणताही सकारात्मक तोडगा समोर आला नसल्याने एसटी कर्मचार्यांनी आजपासून धरणे आंदोलनही पुकारले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील लालपरीची चाकं थांबल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. एकीकडे या संपात राज्यातील बहुतेक बसआगार सहभागी झाले असताना दुसरीकडे संगमनेर बस आगारातील तिनशे कर्मचार्यांनी ‘कर्तव्य’ बजावत या संपाला पाठींबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे उत्तर नगरजिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव व नेवासा या चार आगारांमध्ये संपामुळे शुकशुकाट दिसत असताना संगमनेर बसस्थानकातून मात्र सकाळपासून दीर्घपल्ल्यासह सर्व सेवा सुरळीतपणे सुरु आहे.
राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणेच एसटी महामंडळातील कर्मचार्यांना वेतन मिळावे, 2018 ते 2024 अखेर वाढीव महागाई भत्त्याची व अन्य प्रलंबित थकबाकी मिळावी, महामंडळातील खासगीकरण पूर्णतः थांबवावे, जुनाट व खराब झालेल्या बसेस सेवेतून बाद कराव्यात आणि कर्मचार्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असलेले विश्रांतीगृह बांधावे या प्रमुख मागण्या घेवून एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी आजपासून (ता.3) राज्यव्यापी संप पुकारला आहे. कर्मचार्यांच्या सर्व मागण्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मान्य व्हाव्यात यासाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा संप पुकारला गेल्याने सणासाठी गावाकडे जाणार्या चाकरमान्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
या संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी कृती समितीने गेल्या 9 ऑगस्टरोजी शासनाशी चर्चा केली होती, मात्र त्यातून कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यावर 3 सप्टेंबरपर्यंत कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय घेतला गेला नाही. त्या कारणाने कृती समितीने संपाची हाक दिली आहे. याबाबत जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या संघटनांनी अहमदनगर विभागीय कार्यालयात निवेदन देत याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार आजपासून (ता.3) विभागीय कार्यलयासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांमध्ये निदर्शने केली जाणार आहेत.
एसटी महामंडळाच्या संपात राज्यातील अनेक बसआगार सहभागी झाले असून उत्तर नगरजिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, नेवासा व शेवगाव आगारातील लालपरीची चाकेही सकाळपासून थांबली आहेत. मात्र त्याचवेळी दररोज सुमारे 25 हजारांहून अधिक प्रवाशांची वर्दळ असलेल्या संगमनेर बसआगारावर मात्र या संपाचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. सोमवारी (ता.2) सायंकाळी संगमनेर आगारातून ग्रामीण भागातील मुक्कामी बसेस सुटण्यासह आज (ता.3) पहाटेपासून शालेय व ग्रामीण भागातील बसेससह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना अशा लघु – मध्यम व दीर्घपल्ल्यांच्या सर्व बसेस वेळेवर सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकीकडे उत्तरेतील निम्म्याहून अधिक बसआगारांमधील सार्वजनिक प्रवाशी सेवा ठप्प झालेली असताना दुसरीकडे संगमनेर बसस्थानकात मात्र बसेस आणि प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
संगमनेर बसआगारात एकूण 61 बसेस असून त्यांच्याद्वारे दररोज ग्रामीण, शालेय, लघु – मध्यम व दीर्घ पल्ल्याच्या 376 फेर्या मारल्या जातात. याशिवाय जिल्ह्यातील अतिशय वर्दळीच्या समजल्या जाणार्या या बसस्थानकात रोज राज्यातील वेगवेगळ्या बसस्थानकातून येणार्या बसेसमधूनही हजारों प्रवाशी ये-जा करीत असतात. संगमनेर-अकोल्याच्या ग्रामीणभागातून संगमनेरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांची संख्या आठ ते दहा हजारांच्या आसपास असून त्यांचे शिक्षण संपूर्णतः महामंडळाच्या बसेवरच अवलंबून आहे. मात्र आजपासून सुरु झालेल्या संपात संगमनेरच्या कर्मचार्यांनी सहभागी न होता कर्तव्य बजावण्यास प्राधान्य दिल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.
अशा आहेत प्रमुख मागण्या..
* राज्य शासनाच्या कर्मचार्यांप्रमाणेच वेतन मिळावे.
* महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांचा फरक मिळावा.
* महामंडळाचे खासगीकरण पूर्णतः थांबवावे.
* सुधारित जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करावी.
* इनडोअर व आऊटडोअर मेडिकल कॅशलेस योजना सुरु करावी.
* जुनाट व खराब बसेस बाद करुन नवीन बसेस घ्याव्यात.
* चालक, वाहक व महिला कर्मचार्यांसाठी अद्ययावत विश्रांतीगृह बांधावे.
* वेळापत्रकातील त्रुटी दूर कराव्यात.