घारगावची मंडळ कृषी अधिकारी कार्यालय इमारत बनली धोकादायक! अनेकदा मागणी करुनही दुर्लक्ष होत असल्याने शेतकर्यांतून तीव्र संताप
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील 34 गावांचे केंद्रबिंदू अथवा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या घारगाव येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे. सद्यस्थितीत खिडक्यांच्या काचा फुटल्या आहे, छतही गळत आहे तर आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या इमारतीची दुरूस्ती व्हावी म्हणून अनेकदा मागणी करूनही याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने परिसरातील शेतकर्यांतून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पठारभागातील 34 गावांमधील सर्वसामान्य शेतकर्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी घारगाव येथे चाळीस वर्षांपूर्वी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे. यामुळे आठवडे बाजाराच्या दिवशी म्हणजे मंगळवारी अनेक शेतकरी या कार्यालयात येत असे. यामुळे समस्या सुटण्यास मदत होत असत. मात्र गेल्या एक वर्षांपासून ही इमारत बंद अवस्थेत असल्याने धोकादायक बनली आहे.
बांधकाम जीर्ण झाल्याने पावसाळ्यात छतामधून पाणी गळते, खिडक्यांच्या काचाही फुटल्या असून दरवाजाही उघडत नाही. आतमध्ये उंदीर आणि घुशींची संख्या वाढल्याने तळभाग पोखरला आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे इथे कोणी येण्यासही धजावत नाही. गेल्या एक वर्षांपासून अशी परिस्थिती असल्याने मंडल कृषी अधिकार्यांना संगमनेरातील कार्यालयातच बसून कारभार पाहण्याची वेळ आली आहे. या इमारतीच्या दुरावस्थेबाबत परिसरातील शेतकर्यांनी अनेकदा मागणी करुनही सोईस्करपणे दुर्लक्ष झाल्याने इमारतीची अक्षरशः वाट लागली आहे. यामुळे शेतकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावरुन ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ याचाच प्रत्यय अधोरेखित होत आहे.
घारगाव हे प्रशासकीयदृष्ट्या संगमनेर तालुक्यात मोडते. तर विधानसभा निवडणुकीसाठी अकोले तालुक्यात मोडते. यामुळे पठारावरील नागरिकांची कायमच हेळसांड होत असल्याचे अनेकदा उजेडात येत आहे. अद्यापही काही वाडी-वस्त्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे आता तरी मायबाप सरकारने नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आर्त विनवणी नागरिक करत आहेत.