व्यापारी हिरण प्रकरणाची सखोल चौकशी करा ः लुणिया

नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या पाच दिवसांपूर्वी बेलापूर येथील प्रसिद्ध व्यापारी गौतम हिरण यांचे रात्रीच्या वेळी घरी जात असताना अपहरण झाले होते. त्यांच्या तपासाची मागणी करून देखील त्यांचा तपास लागत नव्हता आणि रविवारी (ता.7) वाकडी शिवारात त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे जिल्ह्यातील व्यापार्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून असे क्रूर कृत्य करणार्या गुन्हेगारांचा तत्काळ तपास लावून त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी ऑल इंडिया जैन सोशल फोरमचे अध्यक्ष व व्यापारी महासंघाचे अभिजीत लुणिया यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात लुणिया यांनी म्हटले आहे की, कुठलाही व्यापारी, व्यावसायिकाचा प्रामाणिकपणे व सचोटीने व्यवसाय करुन दोन पैसे कमावणे व त्यावर आपला चरितार्थ चालवणे हाच एक उद्देश असतो. परंतु समाजातील काही विघातक प्रवृत्ती आपल्या आर्थिक स्वार्थासाठी असे चुकीचे कृत्य करत आहेत. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे व्यावसायिक धास्तावले असून अनेक व्यापार्यांनी बाहेर गावी होत असलेल्या आपल्या फेर्या बंद केलेल्या आहेत. कारण दिवसभर प्रत्येक छोट्या व्यापार्याच्या दारात जाऊन त्याच्याकडून विक्रीचे पैसे जमा करणे आणि ते संध्याकाळी घरी घेऊन येणे हा नित्याचा दिनक्रम आहे. परंतु रात्रीच्या वेळेस अशाप्रकारे अपहरणाची घटना झाल्यामुळे व्यावसायिक वर्ग अत्यंत चिंतित झाला असून हिरण यांच्या अपहरण व खुनाच्या घटनेचा तपास पोलिसांनी तत्काळ न लावल्यास जिल्ह्यात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा लुणिया यांनी दिला आहे.
