पठारावरील ‘लव्ह जिहाद’चा तपास अद्यापही अपूर्णच! महिन्याचा कालावधी उलटला; मुख्य आरोपीसह तिघे अजूनही पसारच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या महिन्यात तालुक्याच्या पठारभागातून समोर आलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात घारगाव पोलिसांकडून सुरु असलेला तपास अद्यापही अपूर्णच आहे. या प्रकरणात एकोणावीस वर्षीय तरुणीने पठारभागातील चौघांंसह मुंबईतील दोघांविरोधात बळजबरीने अपहरण करुन धर्मांतरण आणि शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावरुन घारगाव पोलिसांनी त्याच दिवशी या प्रकरणाचा मास्टरमाईंड व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा माजी पदाधिकारी युसुफ दादा चौगुले याला अटक केली होती, तर आदिल शेख आणि अमर पटेल या दोघांना ऑगस्टच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती. मात्र सदरील तरुणीला प्रेमपाशात अडकावणारा शादाब तांबोळी, शादाबशी संबंध निर्माण करण्यासाठी तिच्यावर दबाव आणणारा कुणाल शिरोळे आणि मुंबईत त्यांची बडदास्त ठेवणार्या आयाज पठाण याच्यासह बळजबरीने धर्मांतरण करण्यात हात असलेले आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
गेल्या 7 जुलैरोजी पठारभागातील एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचे मंचरला (जि.पुणे) बोलावून युसुफ दादा चौगुले व शादाब तांबोळी या दोघांनी अपहरण केले होते. यावेळी पीडित तरुणीने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्यानंतर या प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ चौगुले याने तिला पाण्यातून गुंगीचे औषध देत तिला बेशुद्ध केले व चाकणजवळ आल्यानंतर दुसर्या कारमधून तिला मुंबईला पाठवले. सदरील कारमध्ये एका महिलेसह अन्य एकजण असल्याची माहितीही पीडितेने पोलिसांना दिली होती. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी तपासाची दिशा या गाडीवर केंद्रीत केल्यानंतर सदरील कार साकूरच्या अमर पटेल याची असल्याचे व घटनेच्या दिवशी ‘त्या’ महिलेसोबतच तोच वाहनात असल्याची खात्री पटल्यानंतर शनिवारी (3 ऑगस्ट) पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
तर मुंबईत राहणार्या आदिल शेख याला सानपाडा भागात छापा घालून अटक करण्यात आली. वास्तविक पीडित तरुणीला मंचरमधून सुरुवातीला चाकणला व त्यानंतर दुसर्या वाहनातून मुंबईला नेल्याचे उघड झाल्यानंतर आणि त्यातही चाकणहून मुंबईकडे गेलेल्या वाहनाची आणि त्याच्या चालकाची ओळख स्पष्ट होवून त्यालाही अटक झाल्यानंतर कारमधील ‘ती’ महिलाही गजाआड होण्याची गरज होती. मात्र पोलिसांना अद्यापही ‘त्या’ महिलेचा सुगावा लागलेला नाही. शिवाय अमर पटेल याला ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्या पथकाने मुंबईतून आदिल शेखलाही अटक केली होती.
गेल्या 25 दिवसांपासून हे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतानाही ‘त्या’ महिलेसह मुंबईतील आयाज पठाण, सानपाडा येथील लॉजचा मालक, पीडित तरुणीला खासगी वाहनातून बांद्रा येथे घेवून जाणारे अज्ञात तिघे आणि पीडितेचे धर्मांतरण घडवून आणणारा मौलाना मात्र अद्यापही पोलिसांच्या रडारवर दिसत नसल्याचेही आता समोर येत आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात आता सूस्त झाल्याचे चित्र दिसत असून इतक्या गंभीर प्रकरणातही पोलिसांची भूमिका सामान्यांमध्ये संताप निर्माण करणारी ठरत आहे. मात्र सुरुवातीला पसार आरोपींचा ठावठिकाणा सांगणारे पोलिसच आता त्यांचा तपास लागत नसल्याचे सांगू लागल्याने एकंदरीत या प्रकरणातही काहीसा संशय निर्माण झाला आहे.
या प्रकरणात घारगाव पोलिसांनी मास्टरमाईंड असलेल्या युसुफ दादा चौगुलेला त्याच दिवशी (26 जुलै) श्रीरामपूरमधून अटक केली होती. त्यानंतर 3 ऑगस्टरोजी अमर पटेल याला साकूरमधील त्याच्या राहत्या घरातून तर आदिल शेख याला मुंबईतील सानपाड्यातून ताब्यात घेण्यात आले होते. पीडित मुलीसह शादाब तांबोळी मुंबईत पोहोचल्यानंतर आदिल शेख युसुफ चौगुलेच्या सातत्याने संपर्कात होता. विशेष म्हणजे याच आरोपीने पीडित आणि शादाबसाठी सानपाड्यात मुक्कामाची व्यवस्था करण्यासह तीन दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची आणि बांद्रा येथे नेवून तिचे धर्मांतरण करण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती.
गेल्या 25 दिवसांपासून आदिल शेख घारगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र पोलिसांना त्याच्याकडून या प्रकरणात मुंबईत त्यांना मदत करणार्यांची नावे निष्पन्न करता आलेली नाही. त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असून एकीकडे राज्य सरकार राज्यात हिंदुत्त्ववाद्यांचे सरकार असल्याचे सांगत असताना दुसरीकडे त्याच सरकारच्या नियंत्रणात असलेले घारगांव पोलीस मात्र लव्ह जिहाद सारख्या अतिशय गंभीर प्रकरणांकडेही सामान्य गुन्ह्यांप्रमाणे बघत असल्याने संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणात अद्यापही शादाब तांबोळी, कुणाल शिरोळे आणि आयाज पठाण या निष्पन्न तिघांसह मुंबईतील मदतगारांना अटक होणे बाकी आहे.
गेल्या महिन्यात 7 जुलैरोजी घडलेल्या प्रेमप्रकरण, जबरदस्ती, अपहरण, धर्मांतरण व अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असतांनाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ दादा चौगुले याला अटक केली. त्यानंतर आठवड्याने अमर पटेल आणि आदिल शेख यांना अटक झाली. तेव्हापासून हे तिघेही कारागृहात असून त्यांना जामीन मिळण्याची शक्यता खूप विरळ आहे.