मालपाणी परीवाराची संगमनेरकरांना भेट! रोटरी डोळ्यांच्या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रोटरी क्लब ऑफ संगमनेर व रोटरी आय केअर ट्रस्ट संचलित दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘रोटरी डोळ्यांच्या फिरत्या दवाखान्याचे’ मंगळवारी मालपाणी लॉन्स येथे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उद्योजक राजेश मालपाणी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सुधीर लातूरे आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती, मुंबईचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते रिमोट कंट्रोलच्या मदतीने व्हॅनचे अनावरण करण्यात आले तसेच व्हॅनची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संजय मालपाणी, गिरीष मालपाणी व सर्व मालपाणी परीवार उपस्थित होता. प्रकल्प प्रमुख संजय राठी यांनी या फिरत्या दवाखान्याचे महत्त्व, त्याची गरज आणि मालपाणी परिवाराने दिलेल्या योगदानाबाबत माहिती दिली. तर रोटरी आय केअर अध्यक्ष संजय लाहोटी, सुधीर लातुरे, ओमप्रकाश शेटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. हा फिरता दवाखाना जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आयोजित डोळ्यांच्या तपासणी शिबिरांसाठी वापरला जाणार असून, ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना थेट याच व्हॅनद्वारे रुग्णालयात आणण्याची सुविधा होणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित काकडे, महेश वाकचौरे, आनंद हासे, बद्रीनारायण इंदाणी, पवनकुमार वर्मा, विश्वनाथ मालाणी, रविंद्र पवार, योगेश गाडे, अरविंद कासट, नरेंद्र चांडक, साईनाथ साबळे, महेश ढोले, विकास लावरे, मोहित मंडलिक, संकेत काजळे, सौरभ म्हाळस, राजेंद्र खोसे आदींनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन भारतभूषण नावंदर व मंजु मणियार यांनी केले. तर आभार दीपक मणियार यांनी मानले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे सदस्य, आय केअर ट्रस्टचे डॉक्टर- कर्मचारी तसेच शहरातील दानशूर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोटरी जगभरात करत असलेल्या कामामुळे प्रेरीत होऊन आम्ही या व्हॅनसाठी आर्थिक मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ संगमनेर सोबत आमचे नाते अजोड आहे. चांगल्या कामासाठी कुठेही अडचण यापुढेही येऊ देणार नाही असे उद्योजक राजेश मालपाणी यावेळी म्हणाले.

Visits: 132 Today: 1 Total: 1108715
