पोलीस पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे तरुणाची आत्महत्या! अकोले पोलिसांत चौघांवर गुन्हा; पोलीस ठाण्यात नातेवाईकांचा ठिय्या..


नायक वृत्तसेवा, अकोले
पोलीस पत्नीचे प्रेमसंबंध गावात कळाल्याने बदनामी तर झालीच. मात्र पत्नी व तिच्या प्रियकराकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून निंब्रळ (ता. अकोले) येथील 28 वर्षीय तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मयत तरुणाचे वडील कैलास विठ्ठल वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, मुलगा अमोल कैलास वाकचौरे याने गावातीलच नवी मुंबई पोलीस दलात नोकरीस असलेल्या तरुणीशी 2018 मध्ये प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर दोघे मुंबईला राहण्यास गेले होते. त्यानंतर दोघांत वाद होऊ लागल्याने तो दोन वर्षांपासून गावी निंब्रळ येथे राहत होता. दरम्यान, पत्नीचे योगेश गोसावी (रा. नांदगाव, जि. नाशिक) याच्याबरोबर प्रेमसंबंध असल्याचे त्याला माहीत झाल्याने वाद झाले. तसेच पत्नी व तिच्या आईने मारहाण करुन मुंबई येथून घराबाहेरही काढून दिले होते.

याचबरोबर आत्महत्या करण्यापूर्वी दोघांचे मोबाईलवर संभाषण होऊन वाद झाले होते आणि तिचे प्रेमसंबंध संपूर्ण गावाला समजल्यामुळे वैतागून अमोल वाकचौरे याने घराजवळील शेडच्या लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून पोलिसांनी पत्नी, प्रियकर योगेश गोसावी, संकेत राधाकिसन सोनवणे व पत्नीची आई यांच्या विरोधात गु.र.नं. 448/2022 भा.दं.वि. कलम 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करत आहे. दरम्यान, तरुणाच्या नातेवाईकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात काहीवेळ ठिय्या देखील दिला. यामुळे वातावरण तणावपूर्ण होते. मात्र, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना होताच नातेवाईक शांत झाले.

Visits: 122 Today: 1 Total: 1585829

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *