हरिश्चंद्रगडावरील चोरीस गेलेल्या मूर्ती पुन्हा प्रकटल्या! एकादशीचा मुहूर्त साधीत चोरट्यांनी पांडुरंग गडावर तर रुक्माई पायथ्याशी आणून ठेवल्या

नायक वृत्तसेवा, अकोले
महिनाभरापूर्वी हरिश्चंद्रगडावरुन चोरीस गेलेल्या ‘विठ्ठल-रुक्माई’च्या पाषाण मूर्ती अखेर गवसल्या आहेत. मोक्षदा एकादशीच्या दिनी मूर्ती चोरांना उपरती झाल्याने त्यांनी पांडूरंगाची मूर्ती गडावरील मंदिरात तर रुक्माईची मूर्ती पायथ्याच्या पाचनई गावात आणून ठेवली. या प्रकरणात पुरातत्व खात्याच्या नाकर्तेपणामुळे कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, मात्र राजूर पोलिसांनी जनभावनेचा आदर करुन तक्रार नसतांनाही या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला होता. मात्र आता दोन्ही मूर्ती आढळून आल्याने चोरीच्या घटनेवर एकप्रकारे पडदा पडला आहे. असे असले तरीही राजूर पोलिसांनी चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. पाचनई ग्रामस्थांच्यावतीने आज या दोन्ही मूर्ती विधीवत आज (ता.28) गडावर पुनःस्थापित केल्या जाणार आहेत.

अकोले तालुक्यातील मुळा आणि प्रवरा नदीच्या खोर्यांना मोठा प्रागैतिहासिक वारसा लाभला आहे. अगदी रामायणाच्या कालखंडात माता सितेचे अपहरण करुन लंकापती रावण याच क्षेत्रातून हवाईमार्गाने गेला होता. त्याचा माग काढतांना प्रभु श्रीरामचंद्र व लक्ष्मणही याच मार्गाने गेल्याचे दाखले रामायणात आढळतात. याच परिसरातील हरिश्चंद्रगड म्हणजे मोठा धार्मिक वारसा लाभलेला आणि निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेला परिसर. रावणाशी प्रत्यक्ष युद्धात रावणपुत्र मेघनाथाच्या बाणांनी मुर्चीत झालेल्या श्रीराम-लक्ष्मणासाठी संजीवन बुटी घेवून निघालेल्या हनुमानाकडून द्रोणगिरीचा एक भाग कोसळून त्यातून या गडाची निर्मिती झाल्याचे सांगीतले जाते. चांगदेवांसारख्या महान तपस्व्याने या गडावर दोन शतके वास्तव्य केल्याचेही दाखले पुराणात मिळतात. इतका प्रगल्भ वारसा असलेल्या या गडावर हरिश्चंद्रेश्वराचे प्राचिन मंदिर असून त्यालगतच्या एका गुहारुपी मंदिरामध्ये विठ्ठल-रुक्माईच्या छोटेखानी पाषाण मूर्ती वसवलेल्या होत्या.

गेल्या 2 डिसेंबर रोजी गडावरील मंदिरातून या दोन्ही मूर्ती अचानक गायब झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या वृत्ताने अवघी पाचनई गडावर दाखल झाली आणि सर्वत्र मूर्तींचा शोधही सुरू झाला. मात्र त्या आढळून न आल्याने पाचनईच्या ग्रामस्थांनी राजूर पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला. मात्र हरिश्चंद्रगडावरील वास्तू, अवशेष, मंदिरे व शिल्प यावर पुरातत्त्व खात्याचे अधिपत्य असल्याने त्यांच्याकडून फिर्याद आल्याशिवाय तक्रार दाखल होणं शक्य नव्हतं. त्यामुळे राजूर पोलिसांनी नगरला असलेल्या पुरातत्त्व विभागाला याबाबत कळविले. मात्र सदरच्या मूर्ती ग्रामस्थांनी परस्पर बसविल्या आहेत, त्या पुरातत्त्वच्या सूचीत नसल्याने आश्चर्यकारक उत्तर देत केवळ फलकांपुरत्या मर्यादित असलेल्या या विभागाने तक्रार दाखल करण्यासच नकार दिला. त्यामुळे पाचनईचे ग्रामस्थ संतप्त झाले होते.

जनभावनेचा विचार करुन राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी तक्रार दाखल न होताच मूर्ती चोरांचा तपासही सुरु केला. याबाबत दैनिक नायकला माहिती मिळताच या प्रकारावर 10 डिसेंबरच्या अंकातून प्रकाश टाकला गेला. त्यामुळे हा विषय जिल्हाभर चर्चेत आल्याने मूर्ती चोर घाबरले. अखेर चोरट्यांनी गेल्या शुक्रवारी (ता.25) मोक्षदा एकादशीचा मुहूर्त साधीत या दोन मूर्तीपैकी पांडूरंगाची मूर्ती पुन्हा गडावरील मंदिरात नेवून ठेवली, तर रुक्माईची मूर्ती वन समितीचे अध्यक्ष चंदर भारमल यांच्या घराजवळ आणून ठेवली. सुमारे महिन्याभराच्या अंतराने चोरीस गेलेल्या दोन्ही मूर्ती सहिसलामत सापडल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज (ता.28) या दोन्ही मूर्ती गडावर विधीवत पुनःस्थापित केल्या जाणार आहेत. त्यासाठी छोटेखानी धार्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सुमारे महिनाभराच्या अंतराने चोरीस गेलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती सहिसलामत आढळल्याने ग्रामस्थ आनंदात असले तरीही या मूर्ती कोणी व कशासाठी चोरल्या होत्या हे मात्र अद्यापही अनुत्तरीतच आहे. त्यामुळे असे कृत्य करुन जनभावनेची विटंबना करणार्या चोरांचा तपास करुनच आपण शांत बसू असा काहीसा निर्धार राजूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हरिश्चंद्रगडावरील मूर्ती चोरी स्थानिक गटबाजीतून झाल्याची दबकी चर्चा सुरु आहे. यावरुन जगरहाट्यापासून मैलो दूर असलेल्या येथील आदिवासी बांधवांमध्येही राजकारणाचा शिरकाव झाल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे. मात्र राजकीय कारणांसाठी अथवा एकमेकांची जिरवण्यासाठी अशा प्रकारे लोकभावनेला हात घालणे अयोग्य असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी होवून दोषींना कठोर शासन होण्याची गरज आहे, अन्यथा असे प्रकार यापुढेही सुरू राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

