… तर आम्ही यावर्षी काळी दिवाळी साजरी करू! महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स चालक संघटनेचा सरकारला इशारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीमध्ये लॉन्स आणि मंगल कार्यालयासाठी अनेक निर्बंध असल्याने मंगल कार्यालय आणि लॉन्स चालकांसह यावर अवलंबून असणार्या चोवीस पूरक घटकांतील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अजूनही सरकारने मंगल कार्यालय अथवा लॉन्समध्ये इतर राज्यांसारखी समारंभासाठी परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत ठरलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारत यावर्षी आम्ही काळी दिवाळी साजरी करू असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय आणि लॉन्स चालक यांसह चोवीस पूरक घटकांची बैठक आज (मंगळवार ता.20) संगमनेर शहराजवळी वसंत लॉन्स येथे पार पडली. या बैठकीस असोसिएशनचे राज्याध्यक्ष गोरख कुटे, सचिव रोहिदास धुमाळ, संगमनेर संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय मैड, सचिव अनिल राऊत, उपाध्यक्ष रामनाथ कुर्हे, मंडप डेकोरेशनचे अध्यक्ष महेश जोंधळे, प्रशांत चांदेकर, अनिल चौधरी, खंडू बाणाईत, शिवानी जाधव आदी असोसिएशनचे राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकार्यांना संबोधित करताना राज्याध्यक्ष कुटे म्हणाले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या मागण्या मान्य करण्याकरिता संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत असल्याचे सांगून राज्य परिवहन बसमध्ये 50 प्रवाशांना बसण्याची परवागनी राज्य सरकार देते. मग मंगल कार्यालयाला का नाही असा सवाल उपस्थित केला. इतर राज्यात परवानगी असताना महाराष्ट्रातच का असा उद्विग्न सवाल करुन आम्हाला परवागी द्या आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊ असे म्हणाले. या पार्श्वभूमीवर विजयादशमीला वाजत्र्यांनी सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान मंगल कार्यालयासमोर आपापली वाद्ये वाजवावी, असे आवाहन केले.
गायिका माधुरी गुंजाळ म्हणाली, आम्हांला ऑर्केष्ट्रा कार्यक्रमासाठी किमान एक हजार नागरिकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्या. नाही तर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल म्हणून ही बाब सरकारने गांभीर्याने घ्यावी. तर संगमनेरने महाराष्ट्राला नेहमीच दिशा दिली आहे. आपल्या सर्वांच्या बाबतही संगमनेरच्या गोरख कुटे यांनी हे दाखवून दिले आहे. यापुढेही अशीच एकी कायम ठेवावी अशी प्रतिक्रिया एका स्वयंपाकीने व्यक्त केली. केटरिंगमधील सर्व घटकांना सरकारने लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी शिवानी जाधव यांनी केली. मॉलला परवानगी दिली जाते, तिथे 200 त्यांचेच कर्मचारी आहेत. त्यामध्ये आलेले ग्राहक वेगळेच मग त्यांच्यासारखी परवानगी आम्हांलाही द्या, अशी मागणी नेवासा येथील प्रशांत चांदेकर यांनी केली. कोरोना महामारीमुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. त्यामुळे 50 टक्के किंवा कमीत कमी पाचशे लोकांना परवानगी द्या, अशी मागणी अनिल चौधरी यांनी केली.
महामारीमध्ये कर्ज आणि उपासमारीमुळे अनेकांनी आपले अनमोल जीवन संपविले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दशा आणि पुढील दिशा’ ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगून कोरोनामुळे किमान आपण संघटित झालो. सर्वाधिक रोजगार मंगल कार्यालयातून उपलब्ध होतो. मात्र राज्य सरकार हे जाणून घेण्यास तयार नाही. मॉलला परवानगी देता मग मंगल कार्यालयाला का नाही. यावरुन राज्य सरकार फक्त श्रीमंतांसाठीच काम करतंय का? असा प्रश्न सचिव रोहिदास धुमाळ यांनी केला. आठ महिने सहकार्य केले आता आमची सहनशक्ती पाहू नका. शेतकरी असंघटित असल्याने आज त्यांचे हाल आहेत. तसेच हाल आमचे होत असल्याचे निदर्शनास आणून जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही काळी दिवाही साजरी करू असा इशाराही धुमाळ यांनी दिला. राज्य सरकार जे नियम लागू करेल ते आम्ही पाळण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया खंडू बाणाईत यांनी व्यक्त केली.
या बैठकीस मंगल कार्यालय व लॉन्स मालक-चालक, मंडप, फोटोग्राफर, ऑर्केष्ट्रा, रांगोळी, लॉन्स, लाईट डेकोरेशन, सूत्रसंचालक, साऊंड सिस्टीम, ब्राम्हण, जनरेटर आदी घटकांतील प्रतिनिधी राज्यभरातून उपस्थित होते. तर वाजंत्री वाद्ये, घोडेवाले घोडे, स्वयंपाकी साहित्य घेऊन उपस्थित होते.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच मागण्या मान्य करु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊन नियमावली तयार करणार असल्याचे सांगितले आहे.