पैशांअभावी अंत्यसंस्कार करण्यास नकार; वांबोरी येथील प्रकार

नायक वृत्तसेवा, राहुरी
एकीकडे आपली व्यक्ती सोडून जात असल्याचे दुःख तर दुसरीकडे मरणानंतरही मयताला यातना सहन कराव्या लागत असल्याची दुर्दैवी चित्र सध्या दिसून आले आहे. कोरोनाबाधित मयतावर केवळ पैशांअभावी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णवाहिका चालकांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील एका व्यक्तीच्या कुटुंबात मुलगी सोडता कोणीही नसल्याने ते तांदूळवाडी येथे राहत असलेल्या मुलीकडे रहायला गेले. मध्यंतरी त्यांना कोरोनाची लागण झाली. विशेष म्हणजे येथील सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत होते. दरम्यान, 62 वर्षीय व्यक्तीचे ग्रामीण रुग्णालयात सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास निधन झाले. मुलगी व जावई पॉझिटिव्ह असल्याने दूरचे दोन नातेवाईक अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी दाखल झाले. मात्र, रुग्णवाहिका चालक व कर्मचार्यांनी सांगितले की, अंत्यविधी वांबोरी येथेच होईल. परंतु, त्यासाठी बारा हजार रुपये खर्च लागेल. त्यानंतर हे प्रकरण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पाठक व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे गेले. त्यांनी ताबडतोब चक्रे फिरवल्याने सहा हजार रुपयांत अंत्यविधी करण्यास सांगितले.
