धमकी दिल्याप्रकरणी अकोले पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

नायक वृत्तसेवा, अकोले
‘व्यायामशाळेमध्ये मुली घुसवून त्यांची चित्रफित तयार करून ती समाज माध्यमांवर टाकून व्यायामशाळेमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी तुझी व व्यायामशाळेची बदनामी करू’ अशी धमकी देऊन वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अतुल प्रभाकर गायकवाड यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, शहरातील सारडा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आपली ‘देवा जीम’ या नावाने व्यायामशाळा आहे. तेथे गौतम दगडू कदम हा नियमितपणे व्यायाम करण्यासाठी येत होता. तो गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे व्यायामशाळेत येऊनही पैसे देत नव्हता. त्याच्याकडे पैसे मागितल्याचा राग येऊन तो व्यायामशाळेत यायचा बंद झाला. त्यानंतर शनिवारी (ता.19) संध्याकाळी देवठाण रोड येथील शेताकडे चाललेलो असताना कदम व अन्य अनोळखी तिघेजण यांनी आपणास रस्त्यात अडवून वीस लाख रुपयांची मागणी केली. आपण त्यास नकार दिला असता गौतम कदम याने आपणास दमदाटी करून शिवीगाळ केली. तसेच त्याच्याबरोबर असणार्‍या तिघांनी तुझ्या व्यायामशाळेत मुली घुसवून त्यांची चित्रफित तयार करून व्यायामशाळेत वेश्या व्यवसाय चालतो असे समाज माध्यमांवर टाकून तुझी व व्यायामशाळेची बदनामी करू अशी धमकी दिली. यापूर्वीही देवा जीममध्ये वेश्या व्यवसाय चालतो असे निनावी पत्र पोलीस ठाण्यात पाठवून आपणास त्रास दिला. या प्रकरणी अकोले पोलिसांनी अतुल गायकवाड यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून गौतम दगडू कदम व अन्य अनोळखी तिघेजण यांच्यावर गुरनं.769/2020 भा.दं.वि. कलम 385, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तळपे हे करत आहे.

Visits: 109 Today: 1 Total: 1108416

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *