शेकडो एकर टोमॅटो पिकावर अनोख्या विषाणूचा प्रादुर्भाव! जांभुळवाडी येथील संतप्त शेतकर्याने उपसली टोमॅटोची बाग

नायक वृत्तसेवा, घारगाव
सध्या वातावरणातील बदलामुळे शेकडो एकर टोमॅटो पिकावर अनोखा विषाणू (व्हायरस) पसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील जांभुळवाडी येथील संतप्त शेतकर्याने टोमॅटोची बागच काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे कोरोनाच्या भयावह संकटात मोठा खर्च करुन फुलविलेली टोमॅटो बाग डोळ्यादेखत मातीआड करण्याची दुर्दैवी वेळ टोमॅटो उत्पादकांवर आली आहे.

जांभुळवाडी गावांतर्गत असलेल्या हिरेवाडी, गणेशनगर येथील दिनकर भागा खेमनर, वसंत भागा खेमनर, गोरख भागा खेमनर, बाबुराव भागा खेमनर, तुकाराम कारभारी खेमनर, सुभाष चांगदेव खेमनर, नामदेव नाना खेमनर आदी शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करतात. यातून त्यांना चांगले उत्पन्नही मिळत असते. त्यानुसार यंदाही या शेतकर्यांनी शेकडो एकरवर टोमॅटोची लागवड केली. यासाठी त्यांना खर्चही मोठ्या प्रमाणात आला. परंतु, लागवड केल्यानंतर दोन महिन्यांतच टोमॅटोची झाडे खराब होवून त्यावर अनोख्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने शेती अक्षरशः उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणच्या बाजारपेठाही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यातच बाजारभाव नसल्याने मोठ्या हिंमतीने पिकविलेला मालही लूट भावात द्यावा लागत आहे. अशा एक ना एक समस्या असतानाही शेतकरी कर्जबाजारी होवून जिद्द आणि कष्टाच्या जोरावर पारंपारिक शेती व्यवसाय मोठ्या जोमाने पुढे नेत आहे. परंतु, सर्वच बाजूंनी संकट येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे नेमके करावे तरी काय असा प्रश्न त्यांना पडला आहे.
