एकपात्री प्रयोगातून रंगमंचावर उलगडला ‘मुक्ताई’चा जीवनपट! कवी अनंत फंदी व्याख्यानमाला; डॉ.प्रचिती कुलकर्णींच्या अभिनयाने श्रोते मंत्रमुग्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आदिमाया, आदिशक्तीच्या रुपाचा प्रत्यय देत अवघ्या १८ वर्षांच्या आयुष्याचे सोने होण्याचे भाग्य लाभलेल्या संत मुक्ताईची भक्ती, त्याग शिकवण आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी आर्त हाक देताना भावासाठी दिसलेली व्याकुळता, मोठ्या भावाला केलेला उपदेश आणि आयुष्याच्या विविध वळणावर समाजाने केलेली अवहेलना सहन करीत, आपल्या अलौकिक भावंडांची आई होण्याचे भाग्य लाभलेल्या मुक्ताईची उत्कटता प्रत्यक्ष रंगमंचावर अवघ्या जगाच्या माऊलीचा जीवनपट उलगडणारी ठरली.

अर्धशतकाकडे वाटचाल करणार्या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेच्या ४६ व्या वर्षातील दुसरे पुष्प गुंफताना ‘मुक्ताई.. एक मुक्ताविष्कार’ या एकपात्री प्रयोगाने शुक्रवारी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध झाले. वारकरी संप्रदायाची परंपरा वाहणार्या कुटुंबाचा वारसा घेवून रंगमंचावर उतरलेल्या डॉ. प्रचिती सुरु कुलकर्णी यांनी आपल्या कसदार अभिनयातून संत मुक्ताबाईंचा जीवनपट उलगडला. त्यांची भक्ती, त्याग आणि भावंडांवरील प्रेम प्रत्यक्ष अनुभवताना तुडूंब भरलेले प्रेक्षागार मुसमुसत होते. आजच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. ए. यू. बँकेचे शाखाधिकारी संचित भोजणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. ओंकार बिहाणी, अॅड. प्रदीप व ज्योती मालपाणी, स्मिता गुणे आदी यावेळी मंचावर उपस्थित होते.

फ्लॅशबॅक पध्दतीच्या कथानकातून मुक्ताई त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार सांगताना विविध प्रसंगातून संवाद साधते. संन्याशाची मुले या हिणकस भावनेचे दुखः आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ब्रम्हवृंदाच्या म्हणण्यानुसार देहांत प्रायश्चित्त घेतलेल्या विठ्ठलपंत व रुख्मिणीबाईच्या नंतर सर्वात धाकटी असूनही हळवी मुक्ताई मोठ्या भावंडांच्या सुख-दुःखात आईच्या भूमिकेतून समरस होते. तापी नदीच्या काठावरील सिध्दबेटापासून सुरु झालेला संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व लहानग्या मुक्ताईचा जीवनप्रवास हळूवार उलगडताना डॉ. प्रचिती मुक्ताईशी समरुप होऊन गेल्या होत्या. समाजाने दिलेल्या वागणूकीमुळे व्यथित होऊन घराची दारं बंद करुन आत आत्मलेष करणार्या ज्ञानेश्वराला घराची ताटी उघडण्यासाठी आर्जवे करणारी व्याकुळ मुक्ताई साकारताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून प्रेक्षकही भाऊक झाले होते.

पैठणच्या ब्रम्हवृंदांकडून शुध्दीपत्रक आणण्यासाठी निघालेल्या भावंडाची फरफट, त्यांच्या वाट्याला आलेल्या वेदनांचा थेट प्रत्यय प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला. या दरम्यान रेड्यामुखी वदवलेले वेद, पंढरपूरच्या वास्तव्यात संत नामदेव, गोरोबाकाकांशी झालेली संतभेट, नेवासे येथे अमृतवाहिनी प्रवरेकाठी आले असताना, नाथपरंपरेच्या निवृत्तीनाथांकडे ज्ञानेश्वरांनी श्रीमद्भगवद्गितेचे तत्वज्ञान सर्वसामान्यांना समजणार्या प्राकृत भाषेत निरुपण करण्याचा हट्ट धरला. आपल्या प्रिय शिष्यासाठी गुरु परंपरा खंडीत करुन त्यांनी परवानगी दिल्याने, सर्वसामान्यांच्या भाषेत ज्ञानाची कवाडे खुली झाली. भगवान श्रीकृष्णाचे तत्वज्ञान, सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लयाचा क्रम ज्ञानेश्वरांच्या साध्यासुध्या शब्दातून पृथ्वीमोलाचे झाले.

सच्चिदानंदांनी लेखनीबध्द केलेल्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी विश्वाच्या कल्याणाची याचना करताना ते आभाळापेक्षाही मोठे झाले. आळंदी येथील अखेरच्या वास्तव्यात योगी चांगदेवांची भेट व त्यांचे गर्वहरण आदी प्रसंगासह अवतार कार्य संपल्याने संजीवन समाधी घेतलेली ज्ञानेश्वर माऊली हा सर्व प्रवास डॉ. प्रचिती यांच्या दमदार अभिनयाने जीवंत झाला. संपूणर्र् प्रयोगादरम्यान पूर्ण भरलेल्या प्रेक्षागृहात निरव शांतता होती. प्रसंगानुरुप पार्श्व दृष्ये आणि त्याला दिलेली माऊलींच्या निवडक रचनांची संगीतमय जोड यामुळे कार्यक्रमाची उंची गगनावरी गेली. मुक्ताईच्या भूमिकेतील डॉ. प्रचितींचा अभिनय इतका उंचीचा झाला की, कार्यक्रम संपल्यानंतरही प्रेक्षकांना उठण्याचे भान राहिले नाही. कार्यक्रमाचे प्रास्तविक जसपाल डंग यांनी केले.
