‘निसर्ग कन्सल्टन्सी’ला हाकलण्यामागचे गौडबंगाल काय? ः वहाडणे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहराच्या पाणी पुरवठा योजनेची देखभाल करणारी ‘निसर्ग कन्सल्टन्सी’ कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे? हे जुन्या सत्ताधार्यांनी सांगावे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
कोपरगाव शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करून ती योग्य पद्धतीने पूर्णत्वास नेण्याचे काम करून घ्यायची जबाबदारी असलेल्या निसर्ग कन्सल्टन्सी संस्थेला आधीच्या सत्ताधारी गटाने कामाबद्दल कुठल्याही सूचना-नोटीस न देता हाकलून लावले तसा ठरावही करून घेतला. त्या कंपनीला हाकलण्यामागे काय गौडबंगाल आहे हे जुने सत्ताधारीच सांगू शकतात. नियमबाह्य पद्धतीने काम काढून घेतल्याने व केलेल्या कामाचे बिलही अदा न केल्याने त्या कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात जर त्या कंपनीच्या बाजूने निकाल लागला तर कोपरगाव पालिकेस एक ते दीड कोटी रुपयांचा भुर्दंड पडू शकतो. कारण त्या कंपनीने केलेल्या कामाचे बिल व्याजासह मिळण्यासाठी दावा दाखल केलेला आहे. जनतेच्या कर भरण्यांमधून हे पैसे देणे म्हणजे कोपरगावातील प्रत्येक नागरिकाच्या खिशास झळ बसून शहर विकासाला पैसा कमी पडणार आहे. असा भुर्दंड जनतेला पडू नये म्हणून त्यावेळच्या सत्ताधारी सभासदांकडूनच ते वसूल करता यावेत यासाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागणार आहे. निसर्ग कन्सल्टन्सीला हाकलले नसते तर नवीन पाणी पुरवठा योजना इतकी रखडली नसती. पालिका ताब्यात असताना मनमानी करण्याच्या प्रवृत्तीमुळे संपूर्ण शहराची हानी होते याचे भान सेवकांना कधी येणार? असा खडा सवालही वहाडणे यांनी विरोधकांना विचारला आहे.