कोपरगाव शहरात शिवसेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शिवसेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एकमेकांविरुद्ध आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ऋषीकेश संदीप दळवी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील बाजारतळ येथे रसवंतीचे दुकान असून मंगळवारी (ता.1) सकाळी साडेअकरा वाजता दुकानात असताना कैलास जाधव, सागर जाधव, समीर जाधव, विशाल जाधव यांनी भांडण का केले असे विचारत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पुन्हा आमच्याशी भांडण करशील तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणाले. या भांडणाचा आवाज ऐकून तेथे निशांत झावरे आला असता त्याने आमचे भांडण सोडवली असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरुन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
तर दुसर्या फिर्यादीत समीर जाधव याने म्हटले आहे की, कोपरगाव बस स्थानकाजवळ तारा पान नावाचे पान दुकान असून, मंगळवारी (ता.1) सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास दुकानावर असताना तेथे किरण संदीप दळवी, बंटी प्रकाश दळवी, मोनू संदीप दळवी, निशांत राजेंद्र झावरे आदी चौघांनी येऊन मागील भांडणाचे कारण उकरून काढत शिवीगाळ करू लागले. तेव्हा त्यांना समजावून सांगत असताना त्याचा राग आल्याने त्यांनी लोखंडी गजाने पानाच्या दुकानाचे काचेचे काउंटर तोडून नुकसान केले. तसेच, आमच्याशी भांडण करता काय? असे म्हणून धमकी दिली. या दोन्ही प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुरनं.117/118/2022 भादंवि कलम 323, 504, 506, 427, 504, 506 अन्वये दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.