विशेष पोलीस महानिरीक्षकांची संगमनेर उपविभागातील पोलीस अधिकार्‍यांना शिस्तीची तंबी!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर तसेच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज सकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यास भेट दिली. यावेळी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रातील संगमनेर शहर, तालुका, घारगाव, आश्वी, अकोले व राजूर पोलीस ठाण्यांच्या प्रभार्‍यांना संगमनेर येथे बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. या बैठकीतील संपूर्ण चर्चा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी आदेश बजावल्यानंतरही घडलेल्या संगमनेर शहर व अकोले पोलीस ठाण्याच्या लाचखोरी प्रकरणांच्या केंद्रीत होती. या दोन्ही प्रकरणांवरुन महानिरीक्षकांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे दोन्हीही ठिकाणच्या प्रभार्‍यांना तात्काळ मुख्यालयात हजर होण्याचे आदेश बजावले. त्या संदर्भातील माहिती सोमवारी रात्रीच दैनिक नायकच्या हाती लागली होती. मात्र, त्याला वरीष्ठ अधिकार्‍यांचा दुजोरा न मिळाल्याने ती आज सकाळी सर्वप्रथम दैनिक नायकनेच वाचकांना कळविली.

डॉ.प्रताप दिघावकर आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नेवासा येथील पोलीस कर्मचारी आणि तत्कालिन अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्यात झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लीप समाज माध्यमांमध्ये व्हायरल होण्यासह श्रीरामपूर येथील गुटखा प्रकरण त्यानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंग परदेशी याच्यासह शनिवारी (ता.12) संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख व सोमवारी (ता.14) अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष वाघ हे दोन कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणात सापडल्याने विशेष पोलीस महानिरीक्षकांनी व पोलीस अधीक्षकांनी पदभार घेताना जाहीर केल्यानुसार त्या-त्या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकांना संगमनेर पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक अभय परमार व अकोल्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे या दोन्हीही अधिकार्‍यांची मुख्यालयात बदली केली होती. परमार यांच्याकडे नुकताच तात्पुरत्या स्वरुपात अकोले पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला होता. मात्र, तेथेही लाचखोरीचे प्रकरण समोर आल्याने अवघ्या महिन्याभरातच पोलीस निरीक्षक परमार यांना मुख्यालयात दुसर्‍यांदा बदलीला सामोरे जावे लागले आहे. या वृत्ताने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभार्‍यांनी आपापल्या पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना अवैध व्यावसायिकांशी संबंध व लाचखोरीच्या प्रकरणात गय केली जाणार नसल्याची तंबी भरली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर व पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभार्‍यांची व उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत डॉ.दिघावकर यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील पोलीस दलातील घडलेल्या विविध घटनांचा उहापोह करुन पोलीस दलाची अब्रू घालणार्‍या अशा घटना घडणार्‍या पोलीस ठाण्यांतील दोषींवर कठोर कारवाईचा इशारा देताना भ्रष्टाचार, लाचखोरी, बेशिस्ती व बेआदबी यांसारख्या प्रकारांना थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ज्या पोलीस ठाण्यांमध्ये असे प्रकार घडतील तेथील प्रभार्‍यांनाही कारवाईचा सामना करावा लागेल असे स्पष्ट केले होते. त्याचा प्रत्यय अकोल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना दोनवेळा तर संगमनेर पोलिसांना शिस्त लावून पोलिसांचे अस्तित्व दाखविण्याची चांगली कृती करणार्‍या व सामान्यांची वाहवा मिळविणार्‍या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनाही भोगावी लागली आहे. या कारवाईने मात्र संपूर्ण जिल्ह्याचे पोलीस दल हादरुन गेले आहे.

Visits: 126 Today: 1 Total: 1589879

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *