यादीवरचे ‘ऑल आऊट’ मग हिंसाचाराच्या ‘सूत्रधारांना’ अभय का? तालुका तणावात आणणारेच मोकाट; पोलिसांकडून भुई धोपटून साप मारल्याचा आव..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येत्या गुरुवारी हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र समजली जाणारी आषाढी एकादशी आणि त्याच दिवशी मुस्लिम धर्मियांचा बकरी ईदचा सण आहे. एकाच दिवशी येणार्या या सणांमधून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून उपविभागात गुन्हेगारी कृत्यांमधून पोलीस अभिलेखावर आलेल्या गुन्हेगारांना शोधून त्यांना कायदेशीर तंबी दिली गेली आहे. एकाहत्तर अपप्रवृत्तींना दोन आठवडे हद्दपारही करण्यात आले आहे. त्याचवेळी संपूर्ण संगमनेर तालुक्याला हिंसाचाराच्या दारात उभं करणार्यांना मात्र अद्याप कायद्याचा स्पर्शही करण्यात आलेला नाही. जोर्वेनाक्यावरील घटना घडून महिना उलटत आहे. या एका घटनेने संगमनेरच्या सौहार्दपूर्ण वातावरणात मिठाचा खडा टाकण्याचे काम केले. हा संपूर्ण प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची गरज होती. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी तालुक्याला अस्थिर करण्याचे षडयंत्र रचले, ज्यांच्या नावाची आजही उघडपणे चर्चा सुरु आहे अशा सूत्रधारांना मात्र पोलीस शोधू शकले नाहीत. दाखल गुन्ह्यातून ‘सूत्रधारांची’च नावे गाळण्याचा हा प्रकार संगमनेरच्या सामाजिक स्वास्थासाठी कधीही अनुकूल ठरणार नाही.
28 मे रोजी किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यवसान तब्बल दोनशेजणांच्या सशस्त्र जमावाकडून हल्ला करण्यात झाले. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरुन अवघ्या काही तासांतच व्यापक झालेल्या एखाद्या घटनेतून केवळ तो परिसरच नाहीतर संपूर्ण तालुक्याचे व आसपासच्या प्रदेशाचेही वातावरण खराब होवू शकते. जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या घटनांकडे पाहिल्यास आधी घडलेल्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. संगमनेरात घडलेला प्रकारही तसाच आहे. 1970 ते 1990 पर्यंतच्या दोन-तीन दशकांत संगमनेरात उसळलेल्या जातीय आणि प्रशासना विरोधातील हिंसाचाराने संगमनेरच्या नावावर राज्यात जातीयतेचा डाग लागला होता. गेल्याकाही दशकांत तो पुसण्यात संगमनेरकर यशस्वी होत असताना आणि तालुक्याच्या चौफेर सौहार्दाचे वातावरण असताना जोर्वेनाक्यावरील घटना त्यालाच गालबोट लावणारी ठरली आहे.
खरेतर सुरुवातीला ‘हॉर्न’ वाजवल्याने ‘ईगो’ दुखावल्यावरुन मारहाण झाली असावी असेच चित्र समोर आले होते. मात्र त्यानंतर घडल्या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले म्हणून दोनशे जणांच्या सशस्त्र जमावाने चार-सहा जणांवर जीवघेणा हल्ला करावा ही साधारण गोष्ट कशी ठरेल?. पोलिसांनी या घटनेला अतिशय गांभीर्याने घेवून त्याच्या मूळाशी जाण्याची गरज होती. सुरुवातीला पोलिसांना दोन गटांतील हाणामार्या इथवरच त्याचे गांभीर्य होते, मात्र जेव्हा जोर्वेसह आसपासच्या दोन डझन ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा बोलावून निषेधाचे ठराव केले तेव्हा कोठे कारवाईला वेग आला, मात्र त्यातही संबंध नसलेल्यांना गोवल्याचे आरोप झाले. तेव्हापासून हा सगळा प्रकार घडवणार्यांच्या नावाने या परिसरासह शहरातही शिमगा सुरु आहे, पण त्याचे ध्वनी शहर पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचत नसल्याने संशय निर्माण झाला आहे.
जोर्वेनाका प्रकरणात अटक झालेल्या काहींचा तेथे घडलेल्या हाणामार्यांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांना अटक झाल्यापासून सांगितले जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणार्यांनी जोर्वे नाक्यावर येवून दंगल घडवल्याचा ठपका ठेवून अनेकांना अटक केली. आपली मुलं निष्पाप असल्याचे सांगण्यासाठी अनेकांच्या आई-बापांनी पोलीस ठाण्यात जावून हातही जोडले, त्यांच्या चर्चेतून पोलिसांना सूत्रधारांचा उलगडा करता आला असता. मात्र पोलिसांना केवळ तत्कालिक शांतता हवी होती, त्यातून वातावरण तापत राहिले आणि संगमनेरात सकल हिंदू मोर्चा आयोजित केला गेला. पोलिसांच्या आकलनापेक्षा कितीतरी अधिक संख्येने माणसं या मोर्चात सहभागी झाली, मोर्चा शांततेत पार पडल्याचा आनंद साजरा होत असतांना समनापूरात त्याला गालबोट लागले.
त्या प्रकरणातही घाईगडबड झाल्याचे दिसून आले. शांततेला बाधा आणणार्यांना शासन झालेच पाहिजे, मात्र त्याचवेळी निष्पापांना तोशिष लागणार नाही याकडेही कटाक्ष असण्याची गरज आहे. या प्रकरणातही सतरामधील अनेकांनी आपला प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत केवळ दर्शक म्हणून झालेली शिक्षा असल्याचे सांगितले. खरेतरं भविष्यात पुन्हा शहराचे, तालुक्याचे सामाजिक स्वास्थ्य खराब होणार नाही यादृष्टीने या प्रकरणाचा तपास व्हायला हवा होता. मात्र या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच मुख्य आरोपींना लपवण्यात अथवा त्यांना पाठबळ देण्यात आल्याचे आता लोकांच्याच चर्चेतून समोर येत आहे. असे असेल तर मग त्यांना लपवण्यात अथवा पाठबळ देण्यात कोणाचा स्वार्थ आहे? संगमनेर शहराला पुन्हा 1980 च्या दशकांत ढकलण्याचा तर हा प्रकार नाही? याची उत्तरे शोधण्याची गरज आहे.
पूर्वी जातीय तणावाचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या संगमनेरात त्यावेळी देखील हिंदू-मुस्लिम सौहार्द होता आणि आजही आहे. दोन्ही बाजूच्या बहुतांशी नागरिकांना हा सौहार्द कायम राहावा असे वाटते. जोर्वेनाका प्रकरणी दोनशे जणांवर गुन्हा दाखल आहे. त्यातील अनेकजण अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गेले आहेत. तरीही पोलिसांना त्यांच्या नावाचा बोध होवू नये याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरुन संपूर्ण तालुक्याला जातीय हिंसाचाराच्या दारात सोडणार्यांना पाठबळ देण्यामागे पोलिसांचा निष्काळजीपणा की राजकीय दबाव असा संभ्रमही सामान्यांना झाला आहे.
अहमदनगर शहरातून कोतकर नावाची सद्दी संपवणार्या तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या काळात, संगमनेरातील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या नामकरण वादाचे पडसाद तेलीखुंटावर उमटून रिक्षावाल्यांना मारहाण करण्यात झाले होते. दोन दिवसांनी नेहरु चौकातील एकाला दुकानात घुसून फाईटरने मारहाण झाली. मात्र त्यावेळी कृष्णप्रकाश यांनी संगमनेरात येवून अवघ्या दोन तासांत प्रकरणाच्या मूळाशी जात सूत्राधाराला पहाटे दोन वाजता पोलीस ठाण्यात पाचारण केले आणि ‘कोतकर’ अध्यायाची कथा सांगितली. त्यानंतर आजवर पुन्हा ‘तो’ वाद उद्भवला नाही. तशाच पद्धतीने हा प्रकारही हाताळण्याची गरज असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात हा विषय संगमनेरची शांतता बाधित होण्यास कारणीभूत ठरेल हे मात्र निश्चित.