कोळपेवाडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट नागरिकांच्या खिशावर देखील डल्ला; पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील सर्वात मोठा असलेला कोळपेवाडीचा दर रविवारी भरणारा आठवडे बाजार मोबाईल चोरांसाठी पर्वणी ठरत असल्याचे मागील काही बाजारात अनेक नागरिकांचे मोबाईल चोरी गेल्यामुळे उघड झाले आहे. या बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, गर्दीचा फायदा घेवून चोरटे बाजारसाठी आलेल्या नागरिकांच्या खिशावर देखील डल्ला मारत आहे. याचा अनुभव पत्रकारांना देखील येत आहे; मात्र पोलिसांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे बाजारसाठी येणार्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेले आठवडे बाजार मागील सात महिन्यापासून बंद असलेला रविवारचा आठवडे बाजार दि.17 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास प्रशासनाच्यावतीने परवानगी देण्यात आली. सुरुवातीला काही आठवडे कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने व सुरेगाव परिसरात शिर्डी-लासलगाव राज्यमार्गालगत शेतकरी व छोटे व्यापारी भाजीपाला विकत असल्यामुळे बाजारात गर्दी तुरळक होती. मात्र दिवाळीच्या बाजारापासून कोळपेवाडीच्या आठवडे बाजारात गर्दी वाढली आहे. शिवाय कोळपेवाडी, सुरेगाव, कोळगाव-थडी, शहाजापूर, वेळापूर तसेच पंचक्रोशीतील गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण अत्यल्प असून बाधित रुग्ण कोपरगाव येथील कोविड सेंटर व डेडीकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये औषधोपचार पूर्णतः बरे झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती काही अंशी कमी झाली आहे. त्याचा परिणाम कोळपेवाडीच्या आठवडे बाजारातील गर्दी वाढण्यावर झाला आहे. मात्र ही वाढलेली गर्दी मोबाईल चोरांच्या पथ्यावर पडली असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक रविवारी नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीला जात असल्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांचे झंझट मागे नको म्हणून नागरिक तक्रार करण्याकडे काना डोळा असून मोबाईल चोरीमुळे बाजारासाठी येणारे नागरिक वैतागले आहेत.
कोळपेवाडीचा बाजार ज्याठिकाणी भरतो त्या ठिकाणापासून कोळपेवाडी पोलीस ठाणे हे हाकेच्या अंतरावर आहे. रविवारी (ता.13) पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस ऊनपहाळ्या घेत होते व इकडे मोबाईल चोर आपला हाथ साफ करीत होते. एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी बाजारसाठी आले असता मोबाईल चोरट्यांनी त्यांच्या देखील खिशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्या चोरास पकडले देखील होते. मात्र हाताला झटका देवून गर्दीचा फायदा घेत तो चोरटा पसार झाला. त्या चोरट्याच्या समवेत अजूनही एक व्यक्ती होती. या व्यक्तीने मोबाईल अथवा खिसा मारायचा व मागच्या व्यक्तीकडे मुद्देमाल द्यायचा अशाप्रकारे बाजारात नागरिकांचे मोबाईल व पैशांची दिवसाढवळ्या चोरी होत आहे.
मागील काही बाजारात पोलीस बाजारात उपस्थित असल्यामुळे अशा घटना घडत नव्हत्या. मात्र काही बाजारापासून पोलीस बाजारात उपस्थित राहत नसून सर्वच पोलिस कर्मचारी पोलीस ठाण्याला राखण बसत असल्यामुळे मोबाईल चोरांचे फावत आहे. दोन वर्षापूर्वी कोळपेवाडीमध्ये लक्ष्मी ज्वेलर्सवर रविवारीच दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोन्याची लुट करून दुकानचे मालक श्याम घाडगे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केले होते. या आठवणी अजून ताज्या आहेत. या मोबाईल चोरांकडे असेच दुर्लक्ष होत राहिल्यास त्यांचे मनोबल निश्चितपणे उंचावणार आहे. गहाळ पोलीस प्रशासनाचा फायदा घेवून भविष्यात अशा मोठ्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहून या मोबाईल चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी कोळपेवाडी व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.