कोपरगाव शहरात पोलिसांच्या ढिलाईने गुन्हेगारीने काढले डोके वर नूतन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्याकडून धाडसी कारवाईची अपेक्षा

अक्षय काळे, कोपरगाव
धाडसी व प्रामाणिक कर्तृत्वाने यशस्वी झालेले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या बदलीनंतर पुन्हा कोपरगावातील गुन्हेगारी व कायदा पायदळी तुडवणार्‍यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. तर शून्यावर असलेल्या कोरोना रुग्णवाढीने प्रतिदिनी दहा ते पंधरा संख्येने मजल मारली आहे. याचा परिपाक म्हणजे पोलीस प्रशासनाच्या ढिलाईने सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनीही धाडसी व प्रामाणिक कार्याचा कित्ता गिरवत कोपरगावकरांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलीस निरीक्षक माणगावकर यांची बदली झाल्याचे वृत्त कळताच काही नागरिकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. त्यानंतर शहर व तालुक्यातील गुन्हेगारी व टवाळखोरीने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. दिवसभरात दुचाकी चोरी, किरकोळ चोर्‍या, घरफोड्या, महिलांची छेडछाड व मारहाणी वाढल्या आहते. कोविडचे संकट अद्यापही कायम असून, 70 टक्के नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे दृश्य दिसत आहे. कोणत्या कोणत्या कारणाने पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आल्यानंतर आर्थिक तडजोडीअंती तक्रार दाखल करण्याचे टाळल्याने गुन्हेगारांना मोकळीक मिळत आहे. यातून भविष्यात कायदा-सुव्यवस्थेवर पकड मिळविणे नूतन पोलीस निरीक्षकांना अवघड होईल. त्यासाठी आत्ताच त्यांनी धाडसी कारवाई करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

तत्पूर्वी, बदली झालेले पोलीस निरीक्षक माणगावकर यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारी, राजकारण व पोलीस प्रशासनावर मजबुत पकड ठेवली होती. कोरोना संकटकाळातही योग्य व कडक कारवाई करत स्वतःच्या निगराणीत व समक्ष मास्क न घालणे, सामाजिक अंतर मर्यादा न पाळणे, गर्दी करणे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली होती. यामुळे कोरोना रुग्णवाढ प्रतिदिनी शून्यावर येण्यास मदत झाली होती. परंतु, अवघ्या एक महिन्यातच परिस्थिती शेवटचे टोक कधी गाठेल याची भीती कोपरगावकरांना सतावत आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेणार्‍या नूतन पोलीस निरीक्षक गवळी यांनी धाडसी व प्रामाणिक कार्याचा कित्ता गिरवत कोपरगावकरांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Visits: 184 Today: 1 Total: 1417510

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *