गंगासृष्टीचे संचालक गोरख गुंजाळ यांचे अकाली निधन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील प्रगतिशील शेतकरी, गंगासृष्टीचे निर्माते, तरुण उद्योजक गोरख गंगाधर गुंजाळ यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर येथीलच अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

1988 ला पुणे येथून बीएसस्सी अ‍ॅग्री ही पदवी घेऊन त्यांनी नोकरी न करता शेती केली. त्यांचे अनेक मित्र राज्य सरकारमध्ये अधिकारी झाले. परंतु त्यांनी शेती क्षेत्र निवडले. शेतात विविध यशस्वी प्रयोग करणे हा त्यांचा छंद होता. डाळिंब, भाजीपाला, ऊस याविषयी ते परिसरातील शेतकर्‍यांना कायम मार्गदर्शन करत असत. डाळिंब पिकाचे विक्रमी उत्पादनही त्यांनी घेतले होते. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, शिर्डी राष्ट्रवादीचे नेते महेंद्र शेळके, दौलत उद्योग समूहाचे संजय देशमुख, कृषी अधिकारी संजय मोरे आदी त्यांचे जवळचे मित्र होते. दूध धंद्यातही त्यांनी एकवेळ मजल मारून गंगासृष्टी हा मोठा प्रकल्प उभा केला आहे. अल्पावधीतच गंगासृष्टीने त्यांच्या मार्गदर्शनामुळे गगनभरारी घेतली असून, त्यांचे अकाली जाणे हे अपेक्षित नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांना लिव्हरचा आजार झाला होता. अनेक उपचार करूनही त्यांनी काल संजीवनी हॉस्पिटल संगमनेर येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मोठा मित्र परिवार दुःखात बुडाला आहे. सुस्वभावी व प्रामाणिक भूमिका घेणारा मित्र आज गेला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार डॉ.किरण लहामटे, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते रावसाहेब गुंजाळ, शरद थोरात आदिंनी दुःख व्यक्त केलं आहे.

Visits: 6 Today: 2 Total: 30834

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *