संगमनेरचे ग्रामदैवत लक्ष्मणबाबांची आज यात्रा सायंकाळी लावण्यांचा कार्यक्रम; तर, शनिवारी महाप्रसाद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सालाबादप्रमाणे संगमनेरचे ग्रामदैवत श्री लक्ष्मणबाबांचा आज अक्षयतृतीयेच्या दिनी यात्रौत्सव साजरा होत आहे. पहाटे बाबांच्या शेंदरी मूर्तीला रुद्रभिषेक घालून या उत्सवाला सुरुवात झाली. दोन दिवस चालणार्‍या या उत्सवात दुपारी बाबांच्या उत्सव प्रतिमेची पालखीतून शोभायात्रा (छबीना), सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी व त्यानंतर ‘नाद खुळा’ हा लावण्यांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी पालिकेच्या प्रांगणात होणार्‍या महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होईल. यासर्व कार्यक्रमांना संगमनेरकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष कैलास भरीतकर यांनी केले आहे.


संगमनेर नगरपरिषदेच्या प्रांगणात श्री लक्ष्मणबाबांचे पुरातन मंदिर आहे. फारपूर्वी ब्रिटीश राजवटीत अवतरलेले लक्ष्मणबाबा गोरगरीब व वंचितांच्या मदतीला धावत, त्यांचे तंटे सोडवित असतं. पूर्वी पालिकेच्या प्रांगणात सद्यस्थितीतल्या मंदिराच्या अगदीच पाठीमागील बाजूस मोठी पुरातन बारवं होती, बाबा नेहमी याच परिसरात असतं. त्यांचे देहवसान झाल्यानंतर भाविकांनी या बारवेच्या काठावरच त्यांची कातळातील छोटेखानी मूर्ती तयार करुन मंदिर उभारले. पुढे पालिकेत कॉटेज रुग्णालय सुरु झाल्यानंतर तेथे दाखल होणार्‍या रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाला लवकर आराम मिळावा यासाठी बाबांना साकडे घालीत आणि त्यांच्या मनोकामना पूर्णही होत. आजही ही परंपरा अव्याहत आहे.


याशिवाय संगमनेर शहर व परिसरात जन्माला आलेल्या प्रत्येक अपत्याला अक्षयतृतीयेच्या दिनी बाबांच्या दर्शनासाठी आणण्याचाही प्रघात आहे. असे म्हणतात की गावातील एखादे लहान मुलं एकसारखे रडतं असल्यास त्याला बाबांच्या दर्शनासाठी नेले की ते शांत होते. अनेकजण आजही बाबांना नवस करतात व अक्षयतृतीयेला गुळाचा प्रसाद (शेरी) वाटप करुन त्याची पूर्तता करतात. दरवर्षी अक्षयतृतीयेला बाबांचा यात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने मंदिरासह आसपासच्या परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली आहे.


उत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी सकाळी श्रींच्या मूर्तीला रुद्रभिषेक करण्यात आला. सायंकाळी 4 वाजता पालिका प्रांगणातून बाबांचा पादुका आणि उत्सवमूर्तीची वाजतगाजत शोभायात्रा (छबीना) काढली जाणार आहे. ही मिरवणूक परत आल्यानंतर शास्त्रीचौकात फटाक्यांची आतषबाजी आणि त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता ‘नादखुळा’ हा मराठी लावण्यांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी (ता.11) सायंकाळी चार वाजता पालिका प्रांगणातच जंगी कुस्त्यांचा हगामा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी जोड पाहून एक रुपयापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमानंतर सायंकाळी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले असून संगमनेरकर भाविकांनी यासर्व कार्यक्रमांचा आणि श्री लक्ष्मणबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक धनंजय डाके (भाऊ), रविंद्र गुंजाळ, मिलिंद कानवडे, लक्ष्मण बर्गे, मुकेश काठे, शुभम ताम्हाणे, मनोज मंडलिक, सचिन तिदार, सागर आळकुटे, अंकुश मंडलिक यांच्यासह कमिटी सदस्यांनी केले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 79349

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *