नेवाशातील पाणी पुरवठा कर्मचार्यांचे उपोषण आश्वासनानंतर स्थगित पंधरा महिन्यांपासून पगार थकीत; दोन महिन्यांचे वेतन येत्या सात दिवसांत
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील घोगरगावसह इतर दहा गावांना पाणी पुरवठा करणार्या कर्मचार्यांना पंधरा महिन्यांपासून पगार नसल्याने मोठी उपासमार होत आहे. थकीत पगार मिळावा या मागणीसाठी पाणी पुरवठा करणार्या कर्मचार्यांनी नेवासा पंचायत समितीच्या कार्यालय समोर बुधवारी (ता.9) उपोषण केले. त्यानंतर काही वेळेतच अधिकार्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करून सोडण्यात आले.
या उपोषणाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सचिव दिलीप डिके, नेवासा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गोर्डे, पाणी पुरवठा कर्मचारी संघटनेचे गणेश डावखर यांनी केले. पाणी पुरवठा करणार्या कर्मचार्यांनी उपोषण प्रसंगी म्हंटले की, आम्ही सर्व पाणी पुरवठा कर्मचारी घोगरगावसह इतर दहा गावांना पाणी पुरवठा करत असून गेल्या पंधरा महिन्यांपासून आम्हांला वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हांला पंधरा महिन्यांचे थकीत वेतन मिळावे म्हणून आम्ही नेवासा पंचायत समितीच्या कार्यालय समोर उपोषणास बसलो असल्याचे म्हणाले.
या उपोषणात सलीम शेख, हशमुद्दीन शेख, अशोक साठे, दत्तात्रय राऊत, अंकुश पठाडे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे बाबासाहेब शेळके आदिंनी सहभाग घेतला होता. दरम्यान, सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार व सदस्यांशी झालेल्या चर्चेनुसार गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सहाय्यक गटविकास अधिकारी नवनाथ पाखरे व प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे प्रशासक शिवराम सुपे यांनी पंधरा महिन्यांपैकी दोन महिन्यांचे वेतन येत्या सात दिवसांत देण्याची तरतूद करण्यात येईल. तर उर्वरित वेतन एप्रिल 2021 अखेर पर्यंत देखभाल व दुरुस्ती अनुदान प्राप्त झाल्यानंतर देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणाचे नेतृत्व करणारे गणेश डावखर यांनी उपोषण स्थगित करून ते मागे घेत असल्याचे सांगितले.