आहार कर्मचार्यांना आर्थिक मदत करा; ‘जनशक्ती’ची मागणी
आहार कर्मचार्यांना आर्थिक मदत करा; ‘जनशक्ती’ची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना महामारीमुळे शालेय पोषण आहार कर्मचार्यांना इतर रोजगारही मिळत नसल्याने आहार कर्मचारी मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारने अशा पार्श्वभूमीवर आहार कर्मचार्यांना वार्यावर न सोडता मदत करावी. किमान 2 हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात वर्ग करावे, अशी मागणी सिटू संलग्न जनशक्ती शालेय आहार पोषण संघटनेने केली आहे.

कोरोना संकटातील लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने शालेय पोषण आहार कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाळेमध्ये आहार शिजविण्याचे काम करणार्या या कर्मचार्यांना महिन्याला केवळ दीड हजार रुपयांचे मानधन मिळते. वर्षाकाठी केवळ 11 महिनेच मानधन दिले जाते. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आल्याने हे तुटपुंजे मानधनही कर्मचार्यांना मिळालेले नाही. त्यामुळे गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर, 2020 रोजी जिल्हाभर तहसील कार्यालयामार्फत या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. निवेदन देण्यासाठी आपापल्या तालुक्यात तहसील कार्यालयांवर शालेय पोषण आहार कर्मचार्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ.अजित नवले, सदाशिव साबळे, मेहबूब सय्यद, नामदेव भांगरे, संतोष बोरुडे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, देवराम डोके यांनी केले आहे.

