घ्या आता! चक्क पोलीस ठाण्याच्या समोरच गंठणचोरी! चोरट्यांना धाकच उरला नाही; तासाभरात चार तोळ्यांचे दागिने गायब..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बसस्थानकावरुन वृद्ध महिलेच्या पिशवीतील सात तोळ्यांचे गंठण लांबवण्याचा प्रकार ताजा असतानाच आता चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या समोरुनच महिलेचा गळा ओरबाडून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. शहराच्या कानाकोपर्यात बिनधास्त बागडणार्या गंठण चोरांनी मंगळवारी अवघ्या तासाभरातच शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या दहशतीची उधळण करीत 38 ग्रॅम वजनाचे सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. नेहमीप्रमाणे आरडाओरड, धावपळ आणि थोडाफार पाठलाग झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या दप्तरी आणखी दोन घटनांची भर पडली. ऐन नरात्रौत्सवात सुरु झालेल्या गंठणचोरीच्या एका मागोमागच्या या घटनांनी चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचेही सिद्ध केले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना मंगळवारी (ता.8) दुपारी चारच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या अगदी तोंडावरच असलेल्या संजय गांधीनगर परिसरात घडली. आपले सावज हेरीत बिनधास्तपणे शहराच्या कानाकोपर्यात बागडणार्या दोघा मोटारसायस्वार चोरट्यांना एक महिला गळ्यात दागिने परिधान करुन वडारवस्तीकडून पोलीस ठाण्याच्या दिशेने येत असल्याचे दिसले. त्यांच्या गळ्यातील चमचमणारी सोनसाखळी पाहुन त्यांनी आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घेत लागलीच पाठीमागून येत त्यांच्या गळ्यावर झडप घातली आणि क्षणात 18 ग्रॅम सोन्याच्या साखळीत ओवलेल्या काळ्या मण्यांचे मंगळसूत्र ओरबाडीत सुसाट वेगाने पोलीस ठाण्याच्या समोरुनच तेथून पोबारा केला.
सतत गर्दीने गजबजलेल्या या परिसरात हा प्रकार घडताच भांबावलेल्या ‘त्या’ 53 वर्षीय महिलेने चोरऽ.. चोरऽ.. म्हणून आरडाओरड केली. त्यामुळे आसपासचे काहीजण मदतीसाठी त्यांच्या दिशेने धावले, काही तरुणांनी आपल्या दुचाकीच्या मुठी आवळून ‘त्या’ महिलेला दिलासा देण्यासाठी काही अंतरापर्यंत चोरट्यांचा पिच्छाही केला, मात्र त्यात कोणालाही यश मिळाले नाही. यावेळी जमलेल्या गर्दीतून पोलिसांच्या नावाने बोटं मोडली गेली. तर, काहीजण आता चक्क पोलीस ठाण्यासमोरच अशाप्रकारच्या घटना घडू लागल्याने संतापही व्यक्त करीत असल्याचे दिसले. त्यानंतर सदरची महिला लागलीच पोलीस ठाण्यातही आली आणि त्यांनी घडला प्रकारही पोलिसांच्या कानावर घातला.
तो पर्यंत सायंकाळचे पाच वाजायला होते. तोच असाच प्रकार देवीगल्लीच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरील राजहंस पतसंस्थेसमोर घडला. या घटनेत एका 62 वर्षीय महिलेला गंठणचोरांनी लक्ष्य केले. शहरातील ताजणे मळा परिसरात राहणार्या राजश्री अशोक खैरनार या सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कसबापेठेतील मोठ्या देवीच्या दर्शनासाठी पायीच घरुन निघाल्या होत्या. तत्पूर्वी पोलीस ठाण्याच्या जवळून 18 ग्रॅमचे दागिने ओरबाडून पळालेले चोरटे दुसर्या सावजाच्या शोधात ताजणे मळ्यापासूनच या महिलेच्या मागावर होते. राजहंस पतसंस्थेसमोर त्यांना पोषक असलेली स्थिती दिसताच त्यांनी आपली दुचाकी त्यांच्याजवळ नेत क्षणात हिसका मारला आणि त्यांच्या गळ्यातील दोनतोळ्यांचे गंठण खेचून तेथून धूम ठोकली.
यावेळी देवीच्या दर्शनासाठी जाणार्यांसह रस्त्यावर वाहनांचीही मोठी वर्दळ होती. मात्र त्याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता संगमनेर शहर आपल्याला जणू आंदणच मिळाल्याच्या अविर्भावात चोरट्यांनी आपला कार्यभाग साधून आपल्या ऐच्छिक स्थळाकडे पलायन केले. कसबापेठेनजीक घडलेल्या या घटनेनंतरही ‘त्या’ महिलेची आरडाओरड, लोकांची मदतीसाठी धाव, काहींचा पाठलाग या सगळ्या गोष्टी घडल्या, मात्र त्यातून काहीही हाती लागले नाही. शेवटी पोलीस न्याय करतील या भाबड्या आशेने त्यांनीही देवीचे दर्शन सोडून पोलीस ठाणे गाठले. मात्र तेथे आल्यावर आधीच एक महिला गंठण घेवून दोघे पळाल्याचे गार्हाणं घेवून बसल्याचे चित्र त्यांना दिसले.
एकाच दिवशी दोन घटना आणि त्यातही पोलिसांच्या नाकावर टिच्चून ठाण्यासमोरच घडलेल्या प्रकाराने शरमेने मान खाली जाण्याची अवस्था असतानाही पोलिसांनी आपल्या फाटलेल्या लक्तरांवर आपलेच हात झाकून मिनाक्षी बाळासाहेब कोरडे यांच्या 18 ग्रॅम वजनाच्या आणि 1 लाख 40 हजार रुपये मूल्याच्या सोनसाखळीच्या गुन्ह्यातच ताजणे मळ्यातील राजश्री अशोक खैरनार यांच्या दोनतोळे वजनाच्या आणि 1 लाख 60 हजारांचे मूल्य असलेल्या गंठणचोरीचा गुन्हा घुसवून नेहमीप्रमाणे तक्रार दाखल करुन शाई नासवली आणि दोघीही फिर्यादी महिलांना ‘शोध’ घेण्याचे फाजील आश्वासन देत तेथून रवाना करीत सुटकेचा निःश्वास सोडला. या दोन्ही घटना शहरातील महिलांच्या आणि त्यांच्या दागिन्यांच्या सुरक्षेवरच प्रश्न निर्माण करणार्या ठरल्या.
मध्यंतरी पूर्णतः थांबलेली शहरातील महिलांच्या गळ्यातील गंठणचोरी पुन्हा एकदा जोमाने सुरु झाल्याने शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संगमनेर बसस्थानकातून अकोल्यातील एका 71 वर्षीय वृद्ध महिलेच्या पिशवीतून साततोळ्यांचे गंठण लांबवण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांकडून महिलांच्या सुरक्षेबाबत ठोस काहीतरी कृती होईल अशी अपेक्षा असतानाच चोरट्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या समोरच एका महिलेला लक्ष्य करीत तासाभरात तसाच दुसरा प्रकारही यशस्वी केल्याने पोलिसांबाबतच ‘संशय’ निर्माण झाला आहे. लागोपाठच्या या तिनही घटना खूप बोलक्या असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणार्या आहेत.