प्रवरा खोर्‍यातून जायकवाडीत आठ हजार क्युसेक्सचा प्रवाह!


धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर मंदावला मात्र संततधार कायम
नायक वृत्तसेवा, अकोले
धरणांच्या पाणलोटात सुरु असलेल्या संततधारेमुळे मुळेसह प्रवरा व म्हाळुंंगी नद्या वाहत्या झाल्या आहेत. यंदा भंडारदर्‍याच्या पाणलोटातून जायकवाडी धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षीही जायकवाडी धरण भरण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सद्यस्थितीत प्रवरा नदी दुथडी भरुन वाहत असून हवामान खात्याने पुढील 48 तासांत पुन्हा मुसळधार जलधारा कोसळण्याचा अंदाज वर्तविल्याने निळवंड्यातून सोडण्यात येणार्‍या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठा 20 टीएमसीच्या पार पोहोचला आहे.


गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणार्‍या पर्जन्यधारांनी पाणलोटातील चिंतेचे मळभ दूर करण्यासोबतच आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले आहे. दीर्घकाळ मरगळलेल्या स्वरुपात कोसळणार्‍या पावसाने आता सलग फेर धरल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांचे पाणीसाठे सर्वोच्च पातळीच्या दिशेने अग्रसेर झाले आहेत. अकोले तालुक्यातून उगम पावणार्‍या नद्यांवर उभ्या असलेल्या जलाशयांची स्थिती अत्यंत समाधानकारक असून आजही संततधार कायम असल्याने धरणांची सुरक्षितता म्हणून भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे.


सद्यस्थितीत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 10 हजार 640 द.ल.घ.फुटावर (96.39 टक्के) नियंत्रित करण्यात आला आहे. त्यामुळे धरणात आवक होत असल्याच्या प्रमाणात धरणातून तासागणिक विसर्ग कमी-जास्त केला जात आहे. सकाळी 6 वाजता धरणातून 5 हजार 540 क्युसेक्सने पाणी सोडले जात होते, दुपारी बाराच्या सुमारास त्यात अकराशे क्युसेक्सने वाढ करण्यात आली आहे. सध्या विद्युतगृहासह धरणाच्या सांडव्याद्वारे प्रवरा नदीपात्रातून निळवंडे धरणात 6 हजार 640 क्युसेक्सचा प्रवाह सुरु आहे. घाटघर, रतनगड, पांजरे या भागातील पावसाचा जोर टिकून असल्याने सध्या सुरु असलेल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.


निळवंडे धरणाच्या पाणलोटात भंडारदर्‍याच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. त्यामुळे वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन निळवंड्याच्या जलसाठ्यात सामावणारा विसर्गही रोडावला आहे. मात्र भंडारदर्‍यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने निळवंडे धरणातून प्रवरानदीपात्रात सकाळी सहा वाजता 6 हजार 670 क्युसेक्स तर दुपारी बारा वाजल्यापासून 7 हजार 861 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. भोजापूर जलाशयाच्या भिंतीवरुनही किरकोळ पाणी ओसंडत असल्याने म्हाळुंगी नदीपात्रातून 76 क्युसेक्सने पाणी वाहत असून संगमनेरच्या संगमावर प्रवरा व म्हाळुंगीच्या मिलनाचे विलोभनीय दृष्य संगमनेरकरांना सुखावत आहे. प्रवरानदी दुथडी वाहत असल्याने ओझर बंधार्‍यावरुन जायकवाडीच्या दिशेनेही मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असून दुपारी 12 वाजता 8 हजार 717 क्युसेक्सचा विसर्ग सुरु होता.


मुळा धरणाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगडावर गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेले पावसाचे तांडव काहीसे शांत झाले आहे. मुळा खोर्‍यातील पावसाचा जोर मंदावला असला तरी वरुणराजाने संततधार कायम ठेवल्याने मुळेकडे धावणार्‍या ओढ्यांचे पात्र काही प्रमाणात आकसले असले तरीही त्यांचा प्रवाह मात्र कायम असल्याने कोतुळनजीकच्या पात्रातून 6 हजार 592 क्युसेक्सने पाणी वाहत आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा समाधानकारक अवस्थेत पोहोचला आहे. अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यासह पूर्वभागातील पाडोशी व सांगवी ही दोन्ही जलाशये तुडूंब झाल्याने आढळा धरणातील पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली असून धरण भरण्याच्या स्थितीत पोहोचले आहे.


आज संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडीत 131 मिलीमीटर, घाटघरमध्ये 121 मिलीमीटर, पांजर्‍यात 115 मिलीमीटर, भंडारदरा 79 मिलीमीटर, वाकी 70 मिलीमीटर, निळवंडे 30 मिलीमीटर, कोतूळ 2 मिलीमीटर, अकोले 7 मिलीमीटर व संगमनेर येथे 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुळा धरणाचा पाणीसाठा 20 हजार 179 द.ल.घ.फूट, भंडारदरा 10 हजार 640 द.ल.घ.फूट, निळवंडे 6 हजार 919 द.ल.घ.फूट, आढळा 887 द.ल.घ.फूट तर भोजापूर जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या भिंतीवरुन 76 क्युसेक्सचा प्रवाह म्हाळुंगी नदीपात्रात कोसळत आहे. गेल्या आठ दिवसांच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणांची स्थिती बदलवून टाकल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर टिकून असल्याने दोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. सद्यस्थितीत प्रवरा खोर्‍यातील धरणांमधून जायकवाडीच्या दिशेने 8 हजार 717 क्युसेक्सने तर नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणारे 6 हजार 310 क्युसेक्स पाणी जायकवाडीच्या दिशेने धावत आहे. 103 टीएमसी क्षमतेच्या या महाकाय जलसागराचा एकूण पाणीसाठा 81 टीएमसी (78 टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा 54 टीएमसी (70.47 टक्के) इतका झाला आहे. गोदावरीच्या उर्ध्वभागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीचा जलाशय यंदाही सलग दुसर्‍या वर्षी तुडूंब होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Visits: 8 Today: 1 Total: 116182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *