दिवाळीच्या पंधरवड्यात संगमनेर बस आगार मालामाल! ९३ लाखांच्या उत्पन्नाने मिळाला ‘बुस्टर’ डोस; महिला सन्मान योजनेलाही मोठा प्रतिसाद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पूकारला होता. कोविड संक्रमणात बसलेला मोठा फटका सहन होण्यापूर्वीच संपाचा दणका बसल्याने महामंडळाचे अक्षरशः आर्थिक कंबरडे मोडले. त्यामुळे राज्यातील असंख्य लालपर्‍या आजारी पडून त्यांच्यात इंजनापासून ते प्रवाशी सुरक्षेपर्यंतच्या असंख्य त्रुटी निर्माण झाल्या. चालत्या बसचे छप्पर उडून गेल्याची वा चालक छत्री धरुन बस चालवत असल्याची घटनाही ताजीच आहे. अशा असंख्य संकटांचा सामना करुनही महाराष्ट्राची जीवनवाहीनी समजल्या जाणार्‍या ‘लालपरी’ला यंदाच्या दिवाळीने मालामाल करुन टाकले आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाला भरघोस पैसा उपलब्ध झाल्याने राज्यात १५ हजार गाड्यांचा नवाकोरा ताफाही लवकरच आगारांमधून विखुरला जाणार आहे. यावर्षीच्या दिवाळी पंधरवड्यात एकट्या संगमनेर बस आगाराने जवळपास ९३ लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळवले आहे. विभागाने ठरवून दिलेल्या लक्ष्याच्या कितीतरी पुढे जावून यंदा संगमनेर आगाराच्या चालक-वाहकांसह सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नातून आगाराच्या हंगामी उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. एसटीने सुरु केलेल्या महिला सन्मान योजनेने ‘बुस्टर’ डोसचे काम केल्याचेही संपूर्ण पंधरवड्यात दिसून आले.

शालेय सुट्ट्यांचा मोसम राज्य परिवहन महामंडळासाठी आर्थिक उत्पन्नाचा हंगाम असतो. मुला-बाळांसह अनेक महिला माहेरी, तर अनेक कुटुंब सहलीसाठी, देवदर्शनासाठी बाहेर पडतात. यात सामान्य नागरीकांची संख्या खूप मोठी असल्याने त्यांना राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस हाच सुलभ पर्याय असतो. सामान्यांना परवडणारे दर, राज्यात व परराज्यातही सर्वदूर जाण्याची सोय, सुरक्षित व विश्वासार्ह प्रवास या जमेच्या बाजू आहेत. मध्यंतरी कोविड संक्रमणाच्या प्रदीर्घ कालावधीत लालपरीची चाकेही थांबल्याने महामंडळाचे मोठे नुकसान झाले. आगारांमध्ये दीर्घकाळ बसेस उभ्या राहील्याने अनेकांमध्ये बिघाडही झाले. त्यातून सावरत असतानाच राज्यभरातील कर्मचार्‍यांनी संप पुकारला. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक दृष्टीकोनातून कंबरडेच मोडले.

राज्याच्या ग्रामीण भागातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी एसटी राज्याची जीवन वाहीनी मानली जाते. त्यामुळे संपाचा हा मोठा कालावधीत प्रवाशांसह गाड्यांचेही नुकसान करणारा ठरला. मध्यंतरी पावसाळ्यात तर महामंडळाच्या बसचा चालक वरतून बस गळतेय म्हणून चक्क एका हातात छत्री पकडून बस चालवत असल्याचा, तर अन्य एका घटनेत चालत्या बसचे छप्पर उडून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. राज्यभरातील सगळ्याच आगारातील जुन्या गाड्यांची अवस्था तशीच झाल्याने अशा घटना अंगावर झेलीत राज्याच्या जीवनवाहीनीचाच प्राण कंठापर्यंत आला, पण तिचा प्रवास थांबला नाही. त्याचा परिपाक यंदाच्या दिवाळीने दाखवून दिला असून राज्यातील जवळपास सर्वच आगारांना आर्थिक बुस्टर मिळाला आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही १५ हजार नव्या बसेस घेण्याची घोषणा केली असून येत्या महिनाभरातच राज्यभरातील आगारामध्ये या बस विखुरल्या जाणार आहेत. त्यामुळे एसटीला आता अच्छे दिन दिसणार हे निश्चित.

जिल्ह्यातील महामंडळाच्या आगारांमध्ये अधिक वर्दळीचे स्थानक म्हणून संगमनेरची गणना होते. पुणे आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांमध्ये जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. संगमनेर बसस्थानकातून दररोज सरासरी ५२ फेर्‍या मारल्या जातात दररोज सरासरी १९ हजार ५०० किलोमीटरच्या प्रवासातून आगाराला २७ रुपये प्रतिकिलोमीटर दराने साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. यंदाच्या दिवाळीने मात्र या उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे. दिवाळीच्या ९ ते २१ नोव्हेंबर या १३ दिवसांच्या कालावधीत संगमनेर बसआगारातील लालपर्‍यांनी ७२६ फेर्‍या मारुन २ लाख ८२ हजार २१२ किलोमीटरचा प्रवास केला. पाडवा (ता.१४) ते शाळा सुरु होण्यापूर्वीचा सोमवार (ता.२०) या काळात तर एसटीच्या उत्पन्नाने एकदमच उडी घेतल्याचेही यावेळी दिसून आले आहे.

या कालावधीत १३ नोव्हेंबर रोजी एसटीने ५६ फेर्‍यांमधून २० हजार ४५७ किलोमीटरचा प्रवास करीत आगाराला प्रति किलोमीटर २१ रुपयांप्रमाणे चार लाख ३१ हजार हजार रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तेरा दिवसांत सर्वात कमी उत्पन्न देणारा हा एकमेव दिवस होता. या नंतर दुसर्‍याच दिवशी पाडव्याला तितक्याच फेर्‍यांमधून ३२ रुपये प्रति किलोमीटर दराने २१ हजार ५२२ किलोमीटरच्या प्रवासातून तब्बल ६ लाख ८६ हजार ३८५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यानंतर हा आलेख असाच उंचावत जावून शाळा सुरु होण्याच्या आधी सोमवार (ता.२०) तो ५७ फेर्‍यांद्वारे प्रति किलोमीटर ४७.५० रुपये या दराने २४ हजार ३२० किलोमीटर प्रवासातून एसटीला विक्रमी ११ लाख ५४ हजार ७८७ रुपयांचे उत्पन्न मिळवून देणारा ठरला.

राज्यमार्ग परिवहन महामंडळावर एकामागून एक आलेल्या संकटामुळे त्यांची अवस्था कठीण बनली होती. त्यातून सावरण्यासाठी पैशांची कमतरता असल्याने असंख्य बसेस रस्त्यातच खराब होण्याचे प्रमाण वाढले होते. यंदाच्या दिवाळीने राज्याच्या जीवनवाहिनीला मोठे बळ दिले. सगळ्याच आगारांनी घसघशीत उत्पन्न मिळवल्याने एसटीला अच्छेदिन आले असून शासनाने नवीन १५ हजार बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीपर्यंत त्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. या कालावधीत जिल्ह्यात संगमनेर बस आगाराने ७२६ फेर्‍यांमधून २ लाख ७० हजारांचे लक्ष्य ओलांडून २ लाख ८२ हजार २१२ किलोमीटरच्या प्रवासातून सरासरी ३३ रुपये प्रतिकिलोमीटर प्रमाणे ९२ लाख ९३ हजार ५१८ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे आगाराची आर्थिक चणचण दूर होणार असून नव्याने दाखल होणार्‍या बसेसचाही आगाराला फायदा होईल. एसटीच्या उत्पन्न वाढीत महिला सन्मान व ज्येष्ठ नागरीक प्रवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मोठा वाटा आहे. एकंदरीत राज्यातील महिला आजही लालपरीवरच भरवसा करतात हे देखील यंदाच्या दिवाळीत दिसून आले आहे.

‘यावर्षी दिवाळीत प्रवाशांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संगमनेर बस आगाराच्या उत्पन्नात दुपटीने वाढ झाली आहे. महामंडळाने सुरु केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्याही लक्षनीय वाढली आहे. त्यामुळेही एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एसटीला राज्याची जीवनवाहिनी म्हंटले जाते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांची संख्या अधिक असतानाही आगारातून नियमित होणार्‍या ग्रामीण फेर्‍यांमध्ये कधीही खंड पडू दिला नाही. शाळा बंद असल्याने फक्त शालेय फेर्‍या थांबवण्यात आल्या होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. लवकरच आगारात नवीन बसेसही दाखल होणार आहेत. चालक-वाहकांसह सर्वच सहकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रयत्नातून आपण प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यात यशस्वी झाल्याचे समाधान आहे.’
– प्रशांत गुंड (आगार व्यवस्थापक, संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *