अनैतिक संबंधातील अडसरातून खून करणार्यास आजन्म कारावासाची शिक्षा! सहा वर्षांपूर्वी तालुक्यातील मेंढवण येथे घडलेल्या घटनेतील अन्य दोघांची मात्र पुराव्यांअभावी मुक्तता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याच्या कारणावरुन सहा वर्षांपूर्वी तालुक्यातील मेंढवण येथे झालेल्या खूनाच्या घटनेतील मुख्य आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला आहे. सहा वर्ष चाललेल्या या खटल्यात आरोपी समीर चाँदभाई शेख याच्याविरोधात तालुका पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी त्याला दोषी धरतांना आजन्म कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीचा भाऊ आणि फिर्यादीच्या पत्नीची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे राहणार्या चंद्रकांत सोपान बढे (वय 32) याची पत्नी शुभांगी (वय 25) हिचे त्यांच्या घराशेजारीच राहणार्या समीर चाँदभाई पठाण (वय 23) याच्याशी अनैतिक संबंध होते. या दोघांच्या संबंधाची कुणकूण लागल्यानंतर चंद्रकांत याने आपल्या पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यासोबतच आरोपीच्या आई-वडिलांनाही या प्रकाराची माहिती देवून त्याला समजावण्यास सांगितले. मात्र त्याचा कोणताही परिणाम ‘त्या’ दोघांच्या अनैतिक संबंधावर झाला नाही. त्या दरम्यानच चंद्रकांत बढे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला, त्यानुसार पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समजही दिली होती. मात्र तेव्हापासून समीर पठाण हा फिर्यादी चंद्रकांत बढे याच्याकडे खुनशी नजरेतूनच बघत होता.
त्यातच 10 डिसेंबर, 2014 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत बढे आपल्या शेतातील मजुरांना पैसे देण्यासाठी निघाले असता मराठी शाळेसमोर उभ्या असलेल्या आरोपी समीर पठाण याने त्याच्याकडे पाहून शिवीगाळ केली व ‘तुझ्यात दम असेल तर मला येवून भेट’ अशी दमबाजीही केली. चंद्रकांत बढे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व ते शेताकडे निघून गेले. तेथून परत येतांनाही त्याने तोच प्रकार केल्याने यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी गावातील काहींनी मध्यस्थी करीत त्यांचा वाद मिटवला.
या घटनेनंतर चंद्रकांत यांनी आपला भाऊ सोमनाथ सोपान बढे (वय 24) याला सदरचा प्रकार सांगून त्याला बोलावून घेतले, त्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोमनाथ मेंढवणमध्ये आला. त्यावेळी आरोपी समीर व त्याचा भाऊ अकबर पठाण हे दोघे गावातील एका सलून दुकानाबाहेर उभे होते. चंद्रकांत व सोमनाथ बढे हे दोघे ीाऊ तेथे गेले, यावेळी सोमनाथने ‘तु माझ्या भावजयीवर वाईट नजर ठेवतोस, वर माझ्या भावाला दमबाजी व मारहाण करतोस, तु काय दादा झालास का?’ अशी विचारणा केली. याचा राग येवून अकबर पठाण याने सोमनाथला पकडले व समीर पठाण याने ‘आता तुझा मर्डरच करतो’ असे म्हणत खिशातील चाकू काढून सोमनाथच्या बरगडीत, छातीवर व हातावर सपासप वार करायला सुरुवात केली.
या घटनेनंतर सोमनाथ रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला, ते पाहून दोन्ही आरोपी तेथून पसार झाले. गावातील लोकांनी धावपळ करुन जीपमधून गंभीर जखमी असलेल्या सोमनाथ बढे याला सुरुवातीला संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात व नंतर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले. त्याच दिवशी रात्री चंद्रकांत सोपान बढे यांनी तालुका पोलीस ठाण्यात समीर चाँदभाई पठाण (वय 23), अकबर चाँदभाई पठाण (वय 27) व शुभांगी चंद्रकांत बढे (वय 25) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी वरील तिघांविरोधात भा.दं.वि. कलम 302, 109, 323, 504, 506 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन या घटनेचा सखोल तपास केला व 7 मार्च, 2015 मध्ये आरोपीं विरोधात संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत झालेल्या सुनावण्यात न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, पोलिसांनी सादर केलेले असंख्य पुरावे व सोळा साक्षीदारांच्या नोंदी तपासल्या. प्रत्यक्ष चाकूने वार करणारा आरोपी समीर चाँदभाई पठाण याच्याविरोधात पोलिसांनी सबळ पुरावे सादर केल्याने संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांनी या प्रकरणात त्याला दोषी ठरवतांना आजन्म कारावास आणि 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर उर्वरीत दोन्ही आरोपींविरोधात सबळ पुरावे नसल्याचा निर्वाळा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी कामकाज पाहीले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार दत्तात्रय वाघ व हेड काँस्टेबल पी.डी.डावरे यांनी काम पाहीले.
या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. तत्कालीन तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय भामरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन आरोपीं विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. सहा वर्ष चाललेल्या या खटल्यात पोलिसांनी गोळा केलेले पुरावे ग्राह्य धरुन संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.वाय.भोसले यांनी सोमवारी (ता.15) सोमनाथ सोपान बढे या चोवीस वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याप्रकरणी समीर चाँदभाई पठाण याला दोषी धरले. न्यायालयाच्या निकालानंतर आरोपी समीरला रडूही कोसळले होते.