दिवाळी काळात खरेदीसाठी झालेली गर्दी चिंताजनक ः थोरात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील 9 महिन्यांपासून संपूर्ण मानव जातीवर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रात कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले असून याकाळात नागरिकांचेही मोठे सहकार्य लाभले. मात्र लॉकडाउनच्या शिथिलतेनंतर व दिवाळी काळात खरेदीसाठी झालेली गर्दी ही मोठी चिंताजनक बाब आहे. कोरोना संकट अद्याप संपलेले नसून प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन करताना मंत्री थोरात यांनी म्हंटले आहे की, सणासुदीच्या काळात नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे व वाढणार्‍या थंडीमुळे कोरोना रुग्णांचा आलेख सध्या वाढतो आहे. युरोपियन राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतात दिल्लीमध्येही कोरोनाची मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबियांना कोरोनापासून दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनचे पालन करावे, वेळोवेळी आपले हात स्वच्छ धुवावे. या त्रिसूत्रीचा वापर कोरोना रोखण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणारा आहे. मात्र दिपावलीच्या काळात वाढलेली गर्दी पाहता कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, कुठेही जास्त गर्दी करू नका, घरगुती समारंभ कमीत कमी उपस्थितीमध्ये करा किंवा घरगुती समारंभ टाळा, काही लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या वैद्यकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करून घ्या शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहनही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 

Visits: 14 Today: 1 Total: 117725

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *