डॉ.पूनम निघुते यांचा मृत्यू गळफासानेच! ‘घाटी’चा प्राथमिक निष्कर्ष; आता आव्हान कारण शोधण्याचे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवणार्‍या संगमनेरच्या डॉ.पूनम योगेश निघुते या तरुण महिला डॉक्टरचा मृत्यू गळफासानेच झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष औरंगाबादच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाने (घाटी) काढला असून संगमनेर पोलिसांनाही त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता डॉ.पूनम यांनी आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर आहे. या घटनेनंतर ‘आपली मुलगी असे पाऊल उचलणार नाही’ असे सांगत मयत डॉ.पुनम यांच्या नातेवाईकांनी संगमनेरऐवजी औरंगाबादेत शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला होता. या अहवालानंतर त्यांच्या नातेवाईकांकडून कोणती भूमिका घेतली जाते हे देखील आता महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या रविवारी (ता.29) संगमनेरातील सर्व परिचित असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ.योगेश निघुते यांची पत्नी डॉ.पूनम यांनी आपल्या राहत्या घरातच पंख्याला ओढणीने गळफास बांधून आत्महत्या केली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर संगमनेरात दाखल झालेल्या त्यांच्या नातेवाईकांनी ‘आपली मुलगी असे पाऊल उचलणार नाही’ असे सांगत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. संगमनेर पोलिसांनी त्यांची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यावर अविश्वास दाखवित संगमनेरात उत्तरीय तपासणी करण्यास विरोध केला.

त्यामुळे संगमनेर पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करीत डॉ.पूनम यांचा मृतदेह सोमवारी (ता.30) त्यांच्या नातेवाईकांच्या इच्छेनुसार औरंगाबादच्या मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठविला. तेथे त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली, त्यांचा व्हिसेरा रुग्णालयाने राखून ठेवला असून प्राथमिक निष्कर्षात डॉ.पूनम यांचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे संगमनेर पोलिसांना कळविले आहे. यावर आता त्यांच्या नातेवाईकांची भूमिका काय असेल यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. मयत डॉ.पूनम यांच्यावर सोमवारीच त्यांच्या जालना या माहेरच्या गावी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ.पूनम निघुते यांच्या नातेवाईकांकडून व्यक्त झालेला घातपाताचा संशय घाटी रुग्णालयाच्या निष्कर्षाने दूर झाल्याने व आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी अथवा संदेश मागे न ठेवल्याने त्यांनी आत्महत्या का केली? यामागील कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदरची घटना घडल्यानंतर संगमनेर पोलिसांनी त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला होता. त्यातून काही निष्पन्न होते का याचाही पोलिसांकडून शोध सुरु झाला आहे. याशिवाय त्यांच्या मित्र परिवारासह त्या शिक्षण घेत असलेल्या संस्थेतही पोलिसांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

Visits: 5 Today: 2 Total: 30443

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *