वीजबिल वाढीच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने नेवासा येथे बिलांची होळी आघाडीच्या बिघाडी सरकारला आता जनताच जागा दाखवून देईल ः दिनकर
नायक वृत्तसेवा, नेवासा
आघाडी सरकारच्या वीजबिल वाढीच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने सोमवारी (ता.23) वीजबिलांची नेवासा येथे होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकार्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. आघाडीच्या बिघाडी झालेल्या सरकारला आता जनताच जागा दाखवून देईल अशी घणाघाती टीका भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांनी केली.

नेवासा येथील श्रीरामपूर रस्त्यावर असलेल्या श्री खोलेश्वर गणपती चौकात भाजपच्यावतीने या वाढीव वीजबिलांची होळी करण्यात आली. ‘या सरकारचं करायचं काय.. खाली डोकं अन वरचं पाय’ अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर म्हणाले, कोरोनासारखे मोठे संकट राज्यात आलेले असताना या निर्दयी आघाडी सरकारने अव्वाचे सव्वा वाढीव वीजबिले आकारून सर्वसामान्य माणसांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या काळात व अतिवृष्टीमुळे सहा महिने शेतकरी शेतात गेला नाही. आधीच शेतात पाणीच पाणी असल्याने मोटारी देखील बंद होत्या. त्यामुळे वीज वापरली देखील गेली नाही तरी अशा परिस्थितीत या सरकारने आपले प्रतिनिधी पाठवून वाढीव बीजबिले दिली असल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे. आघाडी शासनातच ताळमेळ नसल्याने निर्णय झाला नाही. कर्जमाफी देखील झालेली नाही त्यामुळे आघाडीच्या या बिघाडी झालेल्या सरकारला आता जनताच जागा दाखवेल असे सांगून त्यांनी आघाडी सरकारचा तीव्र निषेध केला.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांच्या हाताला काम नाही तो घरी बसून आहे. शेतीचे उत्पन्न बंद झालेले आहे तरी वाढीव वीजबिले सर्वसामान्य जनता व शेतकर्यांना आलेले आहेत. भाजपने घेतलेले हितावह निर्णय या सरकारने बंद करण्याचा सपाटा लावलेला असून, कर्जमाफी निर्णयाचा अक्षरशः बट्याबोळ या सरकारने केलेला आहे. कर्जमाफी आश्वासनाची पूर्तता अजूनही या सरकारने केलेली नाही. त्यामुळे हे सरकार लवकरात लवकर जावो अशी प्रार्थना माऊली चरणी करतो अशा शब्दांत शेतकरी नेते दिलीप पवार यांनी आघाडी सरकारचा निषेध केला.

या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, नगरसेवक सुनील वाघ, सचिन नागपुरे, भास्कर कणगरे, माजी सरपंच सतीश गायके, भाऊसाहेब फुलारी, लक्ष्मण मोहिते, प्रताप चिंधे, नगरसेवक राजेंद्र मापारी, जिल्हा सचिव अंकुश काळे, दिलीप नगरे, भाजप युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, स्वप्नील मापारी, कृष्णा परदेशी, कृष्णा डहाळे, आदिनाथ पटारे, अजित नरुला, गोरक्षनाथ बेहळे, ज्ञानेश्वर टेकाळे, शहर उपाध्यक्ष राजेश कडू, शरद जाधव, आकाश कुसळकर, आकाश देशमुख, विवेक कांगुणे, अमोल साळवे, राजेंद्र पंडुरे, शंकर व्यवहारे सहभागी होते.

