संगमनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ! तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दितून साडेचार लाखांचा ऐवज लंपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील चार पोलीस ठाण्यांपैकी तीन ठाण्यांच्या हद्दित चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित तर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी एकूण सात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यात सर्वाधीक चार घटना एकट्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित घडल्या आहेत. यासर्व घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, चार दुचाकी, डाळींबाची फळे व पितळाची भांडी असा एकूण 4 लाख 48 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.


यातील सर्वात मोठी घटना घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दितील साकूरच्या चितळकर वस्तीतून समोर आली आहे. येथील रखमाजी भागा चितळकर व त्यांच्या शेजार्‍याच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात उचकापाचक करुन कपाटात ठेवलेले 3 लाख 34 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेवून पोबारा केला. तर, बोटा शिवारातील यशवंत कारभारी शेळके या शेतकर्‍याच्या डाळींबाच्या बागेतून अज्ञात चोरट्यांनी 21 हजार 250 रुपये किंमतीची 25 क्रेट भगवा जातीची तयार असलेली डाळींबांची फळे बागेतून तोडून नेली.


याशिवाय साकूर येथील विरभद्र विद्यालयाजवळून सचिन दिनकर सोनवणे यांची 20 हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटार सायकल (क्र.एम.एच.17/बी.बी.5007) तर आंबी फाट्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालयाजवळ लावलेली नारायण रामदास भागवत (रा.उंब्रज, ता.जुन्नर) यांची 20 हजार रुपयांची हिरो पॅशन प्रो (क्र.एम.एच.14/एच.ई.6871) दुचाकीही अज्ञात चोरट्यांनी लांबविली आहे. गेल्या चोवीस तासांत घारगाव पोलीस ठाण्यात एकूण चोर चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली असून त्यातून 3 लाख 95 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे.


संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितही चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून स्वातंत्र्य दिनापासून सलग दोन दिवस निंबाळे चौफुलीवर वाटमारीच्या सलग दोन घटना समोर आल्यानंतर बुधवारी कुरण रस्त्यावरील परवेज फिरोजखान पठाण यांची 25 हजार रुपये किंमतीची एस.एफ. ही काळ्या रंगाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली असून घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या व मूळच्या संगमनेरच्या विजयकुमार कृष्णराव जाधव या पोलीस कर्मचार्‍याच्या घराचे गेट तोडून चोरट्यांनी घरात ठेवलेले पितळाचे चार मोठे पातेले व चार नवीन साड्या असा एकूण 3 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.


संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील नान्नज दुमाला येथूनही चोरीचा प्रकार समोर आला असून तेथील अमोल बबन वाकचौरे यांची ज्युपीटर कंपनीची 25 हजार रुपये किंमतीची मोपेड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. गेल्या चोवीस तासांत घारगाव, संगमनेर शहर व तालुका या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दित चोरीच्या एकूण सात घटना समोर आल्या असून त्यात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, चार दुचाकी व पितळाच्या भांड्यासह नवीन साड्या घेवून चोरांनी पोबारा केला आहे. मागील काही दिवसांपासून संगमनेर शहर व घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित चोरीच्या एकामागून एक घटना घडत असून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

Visits: 20 Today: 1 Total: 114899

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *