मवेशी येथे महिला शेतकर्यांची कोरोना व कीटकनाशकबाबत जनजागृती
मवेशी येथे महिला शेतकर्यांची कोरोना व कीटकनाशकबाबत जनजागृती
कृषी विभागासह ‘कोर्टेवा’चा पुढाकार; महिला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील मवेशी येथे नुकतीच अकोले तालुका कृषी विभाग व कोर्टेवा अॅग्रीसाईस सामाजिक संस्थेच्यावतीने फक्त महिला शेतकर्यांसाठी कोरोना वा कीटकनाशकापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपकरणांची माहिती देवून जनजागृती करण्यात आली.

यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. गीताराणी होत्या. महिलांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, आदिवासी महिलांनी शेतात औषध फवारणी करताना नाक व तोंड रुमाल अथवा मास्कने पूर्ण झाकावे, डोळ्यांसाठी चष्मा, हातांसाठी हातमोजे, पूर्ण शरीरासाठी कोट आदिंचा वापर करण्यास सांगितले. याबाबतचे प्रात्यक्षिकही त्यांनी सहजरित्या करुन दाखविले. याच बरोबर फवारणी करताना धूम्रपान करणे टाळावे, पीक संरक्षक रसायनाची बाटली उघडल्यानंतर वास घेवू नये, फक्त परवानाधारक दुकानातूनच कीटकनाशक खरेदी करावे, त्याची सेवा समाप्तीची तारीख तपासून घ्यावी, फवारणी झाल्यावर अंगावरील कपडे स्वच्छ पाण्याने धुवून अंघोळ करावी, अशा विविध प्रबोधनात्मक सूचना गीताराणी यांनी दिल्या.

यावेळी मंडल कृषी अधिकारी गिरीश बिबवे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेची माहिती दिली. दुर्गम आदिवासी भागात बर्याच वेळा दुर्देवी घटना घडतात. पंरतु माहितीअभावी त्याच्या मदतीचा प्रस्ताव तयार होत नाही. ‘आत्मा’ अंतर्गत महिलांनी गटाद्वारे संघटित झाल्यास प्रक्रिया व मूल्यवृद्धी प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून गावातच रोजगार उपलब्ध होतील असेही महिला शेतकर्यांच्या निदर्शनास आणून दिले. शेवटी गावातून कोविड व कीटकनाशके फवारणी जनजागृतीसाठी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी घोषणांनी येथील परिसर दुमदुमून गेला होता. यामध्ये आत्मा वॉटरचे गणेश काकडे, कृषी सहाय्यक यशवंत खोकले, राजाराम साबळे, देवीदास कदम, साहेबराव वायळ, संतोष साबळे, आत्माचे बाळनाथ सोनवणे, सुरेश नवले, बारववाडी, माणिक ओझर, ग्रामविकास समिती, संयुक्त महिला समिती, सरपंच कमल बांबळे, वर्षा कोंडार, हौसाबाई कोंडर, सत्यभामा बोटे, हिराबाई पंडीत, अजय कोंडर, मारुती भांगरे व परिसरातील महिला शेतकरी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी विशेष सहकार्य केले.

