मी राष्ट्रवादीत जाण्याची अफवा राज्यमंत्री तनपुरेच पसरवितात ः कर्डिले

मी राष्ट्रवादीत जाण्याची अफवा राज्यमंत्री तनपुरेच पसरवितात ः कर्डिले
शिवसेनेतून आई-वडीलांना राष्ट्रवादीत यायचे असल्याबाबतही काढला चिमटा
नायक वृत्तसेवा, राहुरी
मी अजिबात भाजप सोडणार नाही. मी राष्ट्रवादीत जाण्याची अफवा राज्यमंत्री तनपुरे हेच पसरवितात. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते राष्ट्रवादीत जाणार, असेही ते म्हणतात, पण नाव कोणाचेच सांगत नाहीत. याचाच अर्थ त्यांचे आई-वडील शिवसेनेत होते. ते अद्यापही शिवसेनेतच असावेत. त्यांनाच राष्ट्रवादीत यायचे असेल, त्यामुळेच मंत्री तनपुरे यांना नाव सांगता येत नाहीत, असा खोचक टोला माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना लगावला.

तनपुरे दाम्पत्यांनी (प्रसाद तनपुरे व डॉ.उषा तनपुरे) शिवसेनेत प्रवेश करून 2014 मध्ये माझ्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडल्याची दिसत नाही. कोठेही त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा फोटो दिसला नाही, की बातमी आली नाही. त्यामुळे तेच अद्याप शिवसेनेत असावेत. त्यांचे पुत्र मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढविली, ते मंत्री झाले. परंतु आई-वडील मात्र शिवसेनेत असावेत. त्यांनाच शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असेल, त्यामुळेच मंत्री तनपुरे असे बोलत असावेत. सत्तेत मित्र पक्ष असल्याने त्यांना शिवसेनेचे थेट नाव घेता येत नाही, म्हणून ते भाजपचे नाव घेऊन काही नेते राष्ट्रवादीत येणार असल्याचे सांगतात, असा टोला कर्डिले यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना लगावला.

ज्यांचा मुलगा सत्तेत मंत्री आहे, ते प्रसाद तनपुरे आंदोलनाची भाषा करतात. नगर-मनमाड रस्त्यासाठी त्यांनी आंदोलनाची भाषा केली होती. राहुरी डेपोसाठीही आंदोलन करणार, असे त्यांनी म्हटले होते. याचाच अर्थ ते अद्यापही शिवसेनेतच आहेत. त्यांची तेथेही अडचण होत असेल. त्यामुळेच सरकारच्या विरोधात म्हणजेच शिवसेनेच्या विरोधात आंदोलने करण्याची भाषा वापरतात. आपला मुलगा राष्ट्रवादीत मंत्री असताना एकप्रकारे मुलाच्याच विरोधात आंदोलनाची भाषा करतात, याचा अर्थ काय समजायचा, असा प्रश्न कर्डिले यांनी उपस्थित केला आहे.

मंत्री तनपुरे यांना शिवसेनेत असलेल्या आई-वडिलांचाच त्रास होत असेल. त्यांची अडचण अशी आहे की, आई-वडील शिवसेनेत गेले होते. ते अद्यापही शिवसेनेतच असावेत. ते दोघे शिवसेनेत आणि पुत्र राष्ट्रवादीत, यामुळेच मुलाला आई-वडिलांचा त्रास होत असेल. आता त्यांना राष्ट्रवादीत घ्यायचे असेल. त्यामुळेच मंत्री तनपुरे असे बोलत असतील, असे सांगून कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांना चांगलाच चिमटा काढला.

 

Visits: 182 Today: 1 Total: 1870447

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *