दीपावलीला ‘लक्ष्मी’चा मान असणार्‍या शिरई कारागिरांवर उपासमारीची वेळ

दीपावलीला ‘लक्ष्मी’चा मान असणार्‍या शिरई कारागिरांवर उपासमारीची वेळ
सरकारकडून पारंपारिक व्यवसाय जपणार्‍या कारागिरांना आर्थिक मदतीची अपेक्षा
धनंजय वाकचौरे, राहाता
हिंदू संस्कृतीतील मोठा सण असणार्‍या दीपावलीनिमित्त प्रत्येकाच्या घरात ‘लक्ष्मी’ म्हणून पूजेचा बहुमान असलेल्या शिरईची (झाडू) काळाच्या ओघात कमी प्रमाणात मागणी होत आहे. याचा थेट परिणाम शिरई बनविणार्‍या कारागिरांवर होऊन आर्थिक गणित कोलमडल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तरीही आपल्या पारंपारिक व्यवसायची नाळ अखंडपणे जोपासत राहाता तालुक्यातील एकरुखे येथील थोरात कुटुंबियांनी व्यवसाय सुरूच ठेवला आहे. सध्या त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे.

शिरई ही प्रामुख्याने शिंदीच्या झाडापासून बनवली जाते. या झाडाची परिसरात संख्या कमी असल्याने थोरात कारागिरांना मध्य प्रदेशातील इंदोर येथून कच्चा माल आणावा लागत आहे. त्यांच्या कुटुंबियांत पाच ते सहा सदस्य असून दिवसाला वीस ते पंचवीस शिरई ते बनवितात. तया शिरायांची साधारण 50 ते 70 रुपये प्रत्येकी नग अशी विक्री केली जाते. मात्र, आधुनिक युगातील बाजारात विविध कंपन्यांचे उपलब्ध होणारे झाडू आणि कोरोना महामारी यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कारागिरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे सरकारने हा पारंपरिक व्यवसाय जपणार्‍या हातांसाठी आर्थिक मदत किंवा कर्ज योजना तयार करावी. नाही तर येणार्‍या काळात लक्ष्मी पुजनाला देखील कंपनीत तयार झालेल्या झाडूंचा वापर करावा लागेल अशी भीती कारागिर व्यक्त करत आहे. अन्यथा हा पारंपारिक व्यवसाय हद्दपार होऊन कारागिरांना उदरनिर्वाह करणेही अवघड होईल.


शासनाने पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. तसेच फायबरसह कंपनीत तयार होणार्‍या झाडूंवर बंदी घालून हाताने बनविलेल्या झाडूंची सरकारी व निम्नसरकारी कार्यालयात सक्ती केल्यास आम्हांला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येतील.
– शंकर थोरात (शिरई कारागिर)

निसर्गात निर्माण होणार्‍या गोष्टींचा वापर केल्यास त्यांचा आपल्या आरोग्यवर निश्चितच चांगला परिणाम होतो. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम जगजाहीर आहेत. यामुळे भारतीय नागरिकांनी संस्कृतीचे जतन करुन आरोग्य जपण्यासाठी प्लास्टिक झाडूंचा वापर न करता शिरईचा वापर करणे आवश्यक आहे.
– डॉ.संतोष मोकळ (राहाता)


लक्ष्मीचे (शिरई) दीपावलीला फार महत्त्व आहे. या सणामध्ये नागरिकांनी शिंदी झाडापासून बनविल्या जाणार्‍या झाडूचा वापर करुन पर्यावरण संवर्धनासाठी प्लाटिक झाडूला हद्दपार करावे.
– देवेंद्र भवर (ग्रामस्थ, एकरुखे)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *