क्रांतीज्योतींनी शिक्षणातून समाज परिवर्तनाचा पाया घातला ः थोरात यशोधन संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय समाज सुधारणेत अनेक महापुरुषांचे त्याग सदैव प्रेरणादायी असून, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसह बहुजनांचे शिक्षण व शिक्षणातून समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य ऐतिहासिक व क्रांतीकारक आहे. या माध्यमातून त्यांनी समाजविकासाचा पाया घातला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, आर.एम.कातोरे, सुभाष सांगळे, विलास कवडे, किशोर टोकसे, अजय फटांगरे, बाळासाहेब गायकवाड, विक्रम ओहोळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क, स्त्री भ्रूण हत्या विरोध, बालविवाह विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, दीनदलितांना व अनाथांना प्रेम व न्याय मिळवून देण्यासाठी भरीव कार्य केले आहे. स्त्रीयांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आहे. आज स्त्री-पुरुषाच्या बरोबरीने शिक्षण, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करत आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे घडले. सावित्रीबाईंनी सामाजिक न्याय, विषमता नाहिशी होणे आणि आत्मसन्मान जागविण्यासाठी त्यांनी स्त्रीयांना शिक्षणातून पुढे आणले. ज्यावेळी स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा नव्हता अशावेळी मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नवसंजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.
आजच्या युगात स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकते स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. अन्यायाविरोधात लढा उभारु शकते हे केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रतीक आहे. देशाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांनी सर्वसमावेशक समाजसेवा करुन एक अपूर्व आणि क्रांतीकारी परंपरा निर्माण केली आहे. त्यांचे स्त्री विषयक कार्य म्हणजे भारतातील स्त्रीयांच्या सार्वजनिक जीवनातील एक युगप्रवर्तक अशीच घटना आहे.
– दुर्गा तांबे (नगराध्यक्षा, संगमनेर)