पाकिस्तानी ‘ग्लोरी’चा मागोवा की केवळ कागदी तपास? आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची मदार निष्क्रिय शाखेवर; संगमनेरची वाटचाल ‘श्रीरामपूर पार्ट-दोन’च्या दिशेने..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांत संगमनेर शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांनी संपूर्ण तालुक्याचे धाबे दणाणले आहेत. एका बाजूला सर्वप्रकारचा व्यापार बंद असतांना थेट शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानात उत्पादित झालेली आणि कोणतीही अधिकृत परवानगी नसलेली ‘ग्लोरी ब्युटी क्रिम’ संगमनेरच्या बाजारात राजरोसपणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे उघड झाले. तर दुसरीकडे, लहान मुलांच्या खेळण्यातील ‘चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया’ असे लिहिलेल्या चौदा लाखांच्या बनावट नोटांच्या बंडलांना वर आणि खाली खर्या नोटा लावून नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश झाला. याशिवाय गांजा तस्करांवरील कारवाईसह शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट पाहता, संगमनेर पोलीस ठाण्याच्या एकूणच कारभारावर आणि विशेषतः गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी) भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि सुरक्षेशी जोडलेला हा विषय अत्यंत संवेदनशील असताना, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत धागेदोरे जाण्याची दाट शक्यता असलेल्या या पाकिस्तानी क्रिम प्रकरणाचा तपास सोपवण्यावरुन आता संशय निर्माण झाला आहे. कायदेशीरदृष्ट्या देशाच्या एकता आणि अखंडतेच्या मुद्द्यावर असलेला हा तपास एखाद्या सक्षम अधिकार्यांकडे जाणं अपेक्षित होतं. मात्र, शहर पोलीस निरीक्षकांनी नेहमीप्रमाणे हिंदी चित्रपटातील बदनाम झालेल्या ‘मुन्नी’प्रमाणे केवळ थापा मारण्यात आणि आपली पाठ थोपटून घेण्यात मग्न असलेल्या निष्क्रिय ‘डीबी’ पथकाकडे या संवेदनशील प्रकरणाची सूत्रे सोपवली आहेत. ज्या शाखेवर नेहमीच मनमानी पद्धतीने वसुली आणि आर्थिक उलाढालीचे गंभीर आरोप झाले आहेत, त्यांच्याच हाती राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित प्रकरण दिल्याने संगमनेर पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर आता संशय व्यक्त होवू लागला आहे.

या प्रकरणाची व्याप्ती केवळ मोगलपूर्यातील एका दुकानापूरती मर्यादित नसून, शत्रूराष्ट्रातून नेमकी ही उत्पादने कोणत्या मार्गाने संगमनेरपर्यंत पोहोचवली जातात, यात कोणते रॅकेट सक्रिय आहे याचा छडा लागणे आवश्यक आहे. मात्र, जिथे जिथे गुन्हेगारी वाढली आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत भर पडली, तिथे तिथे याच शाखेच्या एका विशिष्ट दुय्यम अधिकार्याची भूमिका नेहमीच संशयाच्या भोवर्यात सापडली आहे. कोणतीही युक्ती करुन ‘लक्ष्मीचे रस्ते’ तयार करण्यात पटाईत असलेला हा अधिकारी आणि त्याचे सहकारी गुन्हे उघडकीस आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. असे असतानाही पोलीस निरीक्षकांनी याच अधिकार्यावर मदार ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसरी घटनाही डोळ्यात झणझणीत अंजन घालणारीच आहे. रविवारी सकाळी गजबजलेल्या जनतानगर परिसरात लहान मुलांच्या खेळण्यातील नोटांचे बंडल खरे भासवून फसवणूक करण्याचा मोठा कट रचण्यात आला होता. हुशार नागरिकांनी धावपळ करीत एका संशयिताला रंगेहात पकडल्यामुळे मोठा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात चौदा लाखांच्या बनावट नोटांसह एक लाख 85 हजारांची रोख रक्कम आणि दहा लाखांची टाटा नेक्सन कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात लोकांनी पकडलेला एकजण सोडला तर उर्वरीत तिघेही पसार झाले आहेत. या प्रकरणातही एखाद्या मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा हात असण्याची शक्यता आहे. शिवाय शहरात गांजा तस्करी, जुगार, गोमांस वाहतूक आणि चोर्या-घरफोड्यांचे सत्र अव्याहत सुरु असताना, पोलिसांचे आणि विशेषतः प्रत्येक प्रकरणात मलाई शोधणार्या प्रकटीकरण शाखेचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही.

तीन राजकारण्यांचे आणि दोन आमदारांचे छत्र लाभलेल्या संगमनेर शहराची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत समजले जाणारे हे शहर आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असून, याची तुलना आता कुख्यात होत चाललेल्या ‘श्रीरामपूर भाग दोन’शी होवू लागली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पोलिसांच्या या मनमानी कारभाराला आणि निष्क्रिय ‘प्रकटीकरण’ला वेळीच आवर घातला गेला नाही, तर येणार्या काळात शहराची कायदा व सुव्यवस्था पूर्णतः लयाला जाण्याची भीती आहे. त्यामुळे संगमनेरच्या राजकीय धुरिणांनी आपले राजकारण बाजूला ठेवून या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा शहराचे सामाजिक स्वास्थ संपुष्टात येवून संगमनेरचे श्रीरामपूर होण्यास वेळ लागणार नाही.

संगमनेर शहरात एका बाजूला शत्रूराष्ट्रातून येणारी सौंदर्य प्रसाधने आणि दुसर्या बाजूला गुन्हेगारी प्रकारांचे जाळे वाढत असताना, स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष अत्यंत घातक आहे. सध्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हे शोधण्याऐवजी वसुलीवरच आपले लक्ष केंद्रित केल्याच्या चर्चा सध्या शहरात सुरु आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यावर वेळीच आवर घातला नाही तर दोन आमदारांच्या राजकीय लढाईत संगमनेरच्या समाजिक स्वास्थाची पूरती वाट लागण्याची शक्यता आहे.

