संगमनेरात खाद्यतेलाच्या व्यापाऱ्यावर ‘एफडीए’चा छापा! डब्यांच्या पुनर्वापराचा संशय; कारवाईच्या धास्तीने दुकानांना टाळे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सणासुदीचा हंगाम सुरु झाला की, बाजारपेठेतील उलाढाल वाढते आणि त्याचवेळी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नही ऐरणीवर येतात. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संगमनेरातील खाद्यतेलाच्या ठोक व्यापाराकडे आपली नजर वळवली असून, महात्मा फुले चौकातील मेसर्स श्री साई राम मुरमुरा ट्रेडर्स या आस्थापनेवर केलेल्या कारवाईत तब्बल ५८५ किलो खाद्यतेल असलेले ३९ डबे जप्त करण्यात आले आहेत. या तेलाची किंमत एक लाख एक हजार रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी सीलबंद डब्यांचा पुनर्वापर करण्यास बंदी असतानाही त्याचा वापर झाल्याचा संशय एफडीएच्या पथकाला आल्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईची बातमी शहराच्या व्यापारी वर्तुळात पसरताच ठोक विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक कठोर भूमिका घेतली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर बाजारात येणाऱ्या मेवा-मिठायांसह त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध खाद्यपदार्थांवर आणि पूरक घटकांवर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित केले गेले आहे. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खाद्यपदार्थांच्या ठोक व्यापाराचीही तपासणी सुरु झाल्याने व्यापारी वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.


कायद्यानुसार राज्यात पॅकबंद डब्यात खाद्यतेल भरताना प्रत्येक वेळी नवीन डबा वापरणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाकडे दुर्लक्ष करुन जुन्या डब्यांचा पुनर्वापर केला जात असल्याची माहिती  मिळाल्यावरुन अहिल्यानगर जिल्हा एफडीएच्या पथकाने गुरुवारी संगमनेरातील काही ठोक विक्रेत्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले. महात्मा फुले चौकातील मेसर्स श्री साई राम मुरमुरा ट्रेडर्स येथे करण्यात आलेल्या तपासणीत खाद्यतेलासह अन्य खाद्य उत्पादनांच्या साठ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी ३९ डब्यांमध्ये भरलेले सुमारे ५८५ किलो खाद्यतेल नियमांचे उल्लंघन करुन पॅकबंद केल्याचे आढळले. तेलाच्या पॅकिंगसाठी पूर्वी वापरलेल्या डब्यांचाच पुनर्वापर झाल्याचा संशय आल्याने पथकाने पंचनामा करुन सदरचा माल तपासणीसाठी ताब्यात घेतला.


जप्त करण्यात आलेल्या खाद्यतेलाच्या दर्जाचीही तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर तेल भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या डब्यांचा पुनर्वापर झाला आहे किंवा नाही, याचीही पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार असल्याची माहिती अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी दिली. एवढ्यावरच ही मोहीम थांबणार नसून खाद्यपदार्थांचे उत्पादक आणि पुरवठादार यांच्याकडेही अशाच प्रकारच्या तपासण्या नियोजित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संगमनेर ही अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे. विशेषतः तेला-तुपाच्या व्यापाराची येथे मोठी उलाढाल होत असल्याने शहरातील ठोक बाजारपेठेकडे एफडीएची नजर वळली आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्याने बाजारपेठेत खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध कारवायांमधून खाद्यपदार्थ आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पूरक पदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे यापूर्वीच अधोरेखित झाले आहे. त्यामुळे संगमनेरातील ठोक बाजारपेठेतही प्रशासनाने आपली नजर रोखल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी एफडीएच्या कारवाईची चर्चा शहरभर पसरताच काही ठोक व्यापाऱ्यांची भंबेरी उडाल्याचेही बघायला मिळाले. काही आस्थापनांनी कारवाईच्या धास्तीने दुकानांना टाळे ठोकून धूम ठोकली होती अशीही चर्चा आहे. त्यामुळे एफडीएच्या या कारवाईने केवळ एका व्यापाऱ्याचा साठा जप्त केला नसून, खाद्यतेलाच्या ठोक व्यापारातील नियम पालनाचा मुद्दाच ऐरणीवर आणला आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या ताटात पोहोचणाऱ्या प्रत्येक खाद्यपदार्थाची सुरक्षितता केवळ व्यापाऱ्याची जबाबदारी नसून ती सार्वजनिक आरोग्याशी निगडित बाब आहे. त्यामुळे तेलाचा दर्जा, पॅकिंगची पद्धत आणि डब्यांच्या वापराबाबत नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडे प्रशासनाने अशा प्रकारच्या गोष्टींकडे कठोरपणे पाहणे आवश्यक आहे. संगमनेरातील ही कारवाई तसेच संकेत देत आहे.

जुन्या डब्यांचा ‘नवा’ खेळ कधी थांबणार?
संगमनेरातील खाद्यतेल विक्रेत्यांवर एफडीएने करडी नजर फिरवली असतानाच शहराच्या अगदी लगतच जुन्या खाद्यतेलाच्या डब्यांना पुन्हा वापरासाठी तयार करण्याचा उद्योग मात्र आजही जोमाने सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित नियमांची अंमलबजावणी विक्रेत्यांपूरतीच मर्यादित न राहता, अशा डब्यांचा पुनर्वापराच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या साखळीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे.

Visits: 10 Today: 10 Total: 2084534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *