गजबजलेल्या ठिकाणी गांजा विकणारा ताब्यात संगमनेर पोलिसांचा छापा; एक किलो वजनाचा गांजा हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या अवतीभोवती अंमलीपदार्थ विकणार्‍यांची दाटी झाल्याचे आरोप होत असतानाच आता शहराचे हृदय समजल्या जाणार्‍या शिवाजीनगर परिसरातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गुरुवारी सायंकाळी शहर पोलिसांच्या पथकाने घातलेल्या छाप्यात वैदूवाडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागातून एका गांजा तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्या ताब्यातून सुमारे एक किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सदरील आरोपी कासारा दुमाला शिवारातील रहिवाशी असल्याने यामागे कुप्रसिद्ध ‘लेडी डॉन’चा सहभाग असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून प्रामाणिक तपास झाल्यास त्यामागील सत्य समोर येवू शकते. मात्र शहर पोलिसांची कार्यपद्धती पाहता तसेकाही घडण्याची शक्यता नाही.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई गुरुवारी (ता.29) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या शिवाजीनगर परिसरात करण्यात आली. या भागात एक इसम खुलेआम गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना देत छापा घालण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलिसांनी परिसरात धडक दिली असता वैदूवाडी जवळील रस्त्याच्या कडेला संशयीत हालचाली करणार्‍या एकावर त्यांची नजर खिळली.


काहीवेळ प्रतिक्षा करुन त्याच्यावर पाळत ठेवली असता तो जवळ आलेल्या इसमांकडून पैसे घेवून त्यांना काहीतरी देत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे चारही बाजूने पथकाने एकाचवेळी धावा करीत त्याच्या जागेवरच मुसक्या आवळल्या. यावेळी त्याच्या झडतीत सुमारे 9 हजार रुपयांचा 980 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या प्रकरणी पोलीस काँन्स्टेबल रोहिदास शीरसाठ यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी प्रशांत पोपट घेगडमल (वय 26, मूळ रा.हिवरगाव पावसा, हल्ली मु.कासारवाडी) याच्या विरोधात अमली औषधी द्रव्य, मन प्रभावी पदार्थ अधिनियमाच्या कलम 8 (क) सह 20 (ब), (2), (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


दीड दशकापूर्वी कोल्हार येथून संपूर्ण जिल्ह्यात गांजाचा पुरवठा केला जात असे. मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी एकाचवेळी छापे घालून तेथील गांजा व्यवसायाला खणत्या लावल्या. त्यानंतर कोल्हारमधील गांजा तस्करी पुर्णतः संपुष्टात आली. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी महामार्गावर संशयास्पद वाटणार्‍या एका अलिशान वाहनाची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपयांचा गांजा आढळून आला होता. त्या प्रकरणात संगमनेरच्या एका महिला गांजा तस्कराचे नाव ठळकपणे समोरही आले होते. तेव्हापासून गांजा वितरणाचे केंद्र कोल्हारहुन संगमनेरकडे सरकल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.


धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण, ठाणे व पनवेल येथील पोलीस पथकांनी रात्री परस्पर येवून अनेकदा कासारवाडीत छापे घालून कारवाई केली आहे. मात्र अपवाद वगळता संगमनेर पोलिसांनी हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारवाडीत कधीही छापा घातल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे कोल्हारनंतर संगमनेरात गांजा तस्करीचा उद्योग स्थिरावल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. शहरात सहज गांजा उपलब्ध होवू लागल्याने विद्यार्थीदशेतील मुलंही त्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून काही महाविद्यालयांच्या आसपासच्या चहा टपर्‍या व ढाबे गांजा ओढण्याची ठिकाणे म्हणून समोर येत आहेत. पोलिसांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत समोर आलेल्या आरोपीची सखोल चौकशी करुन शहरातील गांजा नेटवर्क उध्वस्त करण्याची गरज आहे.


शिक्षणाची पंढरी समजल्या जाणार्‍या पुण्यात एकामागून एक कारवायांमध्ये मेफेड्रोन (एमडी) सारखे घातक अंमली जप्त होत असल्याने पालकांच्या चिंता वाढलेल्या असताना संगमनेरसारख्या ठिकाणीही गांजा नावाचा अमली पदार्थ सहज कोठेही मिळत असल्याने अनेक विद्यार्थी नशेच्या गर्तेत अडकत आहेत. गुरुवारी पोलिसांनी कारवाई केलेला शिवाजीनगरचा परिसर अतिशय दाट लोकवस्तीचा भाग आहे. या ठिकाणाहून काही अंतरावर मालदाड रोडकडे दृष्टीक्षेप टाकल्यास त्या परिसरात अनेक कोचिंग क्लासेस आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होवून संगमनेरातील गांजा तस्करीचे नेटवर्क उध्वस्त होण्याची गरज आहे.

Visits: 29 Today: 1 Total: 98269

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *