शंभर तासानंतरही बुडीताचा शोध नाही! गुरुवारी घडली होती घटना; कुटुंबियांचा जीव मात्र टांगणीला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या गुरुवारी संगमनेरच्या गंगामाई घाटावर बुडालेल्या तरुणाचा पाचव्या दिवशीही थांगपत्ता लागलेला नाही. सुरुवातीला पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्याचा शोध होवूनही त्यात अपयश आल्याने अखेर आमदार अमोल खताळ यांच्या विनंतीवरुन एसडीआरएफच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला आहे. मात्र घटनेला पाच दिवस उलटल्यानंतरही अद्याप बुडीत तरुण सापडत नसल्याने त्याच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे. सदरची घटना घडली त्यावेळी गंगामाईघाटाजवळ नदीपात्रातून तीन हजार क्सूसेकचा प्रवाह होता, त्याने शुक्रवार व शनिवारी चढत्याक्रमाने 12 हजार क्यूसेकचा टप्पा गाठल्यानंतर सद्यस्थितीत गंगामाई परिसरातून साडेसात हजार क्यूसेकचा प्रवाह वाहत आहे. त्यामुळे शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला असून बुडालेला तरुण एखाद्या कपारीत अथवा गाळात फसला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता बचावकार्यासाठी धरणातील विसर्ग नियंत्रीत करणे अशक्य असल्याने विपरीत स्थितीतही यांत्रिकबोटीचा वापर करुन शोधकार्य सुरुच ठेवण्यात आले आहे.


गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता.30) शहरालगतच्या गंगामाई घाट परिसरात सदरील दुर्दैवी घटना घटली होती. धरणांच्या पाणलोटात तुफान पाऊस सुरु असल्याने तांत्रिकपातळी गाठलेल्या भंडारदरा व निळवंडेसह आढळा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे संगमनेरनजीकच्या प्रवरानदीला पूर आला आहे. अशास्थितीत एखादी दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण घाट परिसरात धोक्याचा इशारा देणारे फलकही लावण्यात आले आहेत. त्याद्वारे नागरिकांना नदीपात्रालगत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र असे असूनही पारेगाव येथील ऋषिकेश नवनाथ गडाख या 25 वर्षीय तरुणाने त्याकडे दुर्लक्ष करीत दुपारी साडेबाराच्या सुमारास कपडे काढून गंगामाई घाटावरुन पाण्यात उडी घेतली.


त्यावेळी प्रवरापात्रातील त्या भागात पाण्याचा विसर्ग तीन हजार 46 क्यूसेक इतका होता, त्यामुळे पाण्याला नैसर्गिक गती असल्याने उडी मारणारा तरुण वाहून जावू लागला. त्यावेळी घाट परिसरात जेमतेम वर्दळ असल्याने त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. या तरुणासोबत त्याचे अन्य मित्र असण्याचीही शक्यता आहे. मात्र या प्रकाराने घाबरुन त्यातील एकाने किंवा एखाद्या अज्ञाताने त्या सूचना फलकावरील क्रमांकावर सुरक्षादलाला फोन करुन घडला प्रकार कळवला. त्यानंतर सुरक्षादलासह अग्निशमन दलाकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला. त्यातच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचा जोरही वाढत गेल्याने भंडारदर्‍यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जावून निळवंडे धरणानेही तांत्रिक पातळी गाठली.


सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरण परिचालन सूचीनुसार धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे गंगामाई परिसरातील नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत जावून पहिल्या 24 तासांत 9 हजार 600 क्यूसेक तर, पुढच्या 24 तासांत शनिवारी सकाळपर्यंत 12 हजार क्यूसेकपर्यंत वाढत गेली. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुरु असलेले शोधकार्य थांबवावे लागले. तरुण मुलगा पाण्यात बेपत्ता होवून 72 तास उलटूनही त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे आमदार अमोल खताळ यांनी जिल्हाधिकार्‍यांना बुडीताच्या शोधासाठी राज्य आपत्ती निवारण कृतीदलाचे पथक (़एसडीआरएफ) पाठवण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत यांत्रिक बोट आणि अत्याधुनिक सामग्रीसह दाखल झालेल्या पथकाकडूनही गेल्या 24 तासांपासून त्याचा शोध सुरु आहे, मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही.


या दरम्यान संगमनेरातील मुरब्बी पोहणार्‍यांनीही बुडीताचा शोध घेण्यासाठी प्रचंड प्रवाहात बुड्या मारल्या, मात्र अद्याप कोणत्याही यंत्रणेला यश आलेले नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने कदाचित बुडीत तरुण एखाद्या कपारीत अथवा गाळात फसला असण्याची शक्यता आहे. त्यासाठी पाण्यात चालणार्‍या कॅमेर्‍यांचा वापर करुनही शोध सुरु आहे, मात्र गढूळ पाण्यामुळे तो देखील फारसा प्रभावी ठरलेला नाही. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत आज सकाळपर्यंत धरणातील विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला असून सकाळी घटनास्थळाजवळ पाण्याचा प्रवाह साडेसात हजार क्यूसेक होता. पाणलोटात मंदावलेला पाऊस पाहता त्यात आणखी घट होण्याची शक्यता असून धरण व्यवस्थापनाकडून काही तासांचा अवधी दिला जाण्याचीही शक्यता आहे. तूर्त घटनेला 120 तासांचा अवधी उलटल्यानंतरही बुडीत तरुणाचा शोध लागत नसल्याने त्याचे कुटुंबिय व आप्त हतबल व हताश झाले आहेत.


घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या प्रचंड पावसामुळे मुळा वगळता उत्तरेतील सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून भंडारदरा व निळवंडे या मोठ्या धरणांसह अन्य सगळ्याच प्रकल्पांवरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे मुळा, प्रवरा, आढळा व म्हाळुंगी यासर्व नद्या दुथडी वाहत असल्याने प्रशासनाने सावधगिरी म्हणून नागरिकांना नदीपात्राजवळ जाण्यास मनाई केली आहे. ऋषिकेश गडाखने ज्या घाटावरुन पात्रात उडी घेतल्याचे सांगितले जाते, त्या ठिकाणी पालिकेने वेगवेगळ्या ठिकाणावर ‘धोक्याचा इशारा’ देणारे फलकही लावले आहेत. असे असतांनाही बुडालेल्या तरुणाने दुथडीपात्रात उडी घेण्याची हिम्मत केल्याने आश्‍चर्यही व्यक्त होत आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1935913

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *